बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे आणि बेळगावच्या प्रशासनात महत्त्वाचे स्थान असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या संभाव्य विभाजनाबद्दल एक मोठे सूतोवाच केले आहे. याच सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचे विभाजन करण्याची आपली तीव्र इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे.
हुक्केरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होऊ शकते, पण ते लगेच होणार नाही. याच सरकारच्या कार्यकाळात ते करण्याची आमची इच्छा आहे. त्यांच्या या विधानाने दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मागणीला नव्याने बळ मिळाले आहे.
केपीसीसी प्रदेशाध्यक्षपद कोणाला आणि केव्हा द्यायचे, हे हायकमांडने ठरवायचे आहे. जरी आम्ही इच्छुक असलो तरी जबाबदारी द्यायची की नाही हे हायकमांडने ठरवायचे आहे. या संदर्भात कोणीही कोणावर दबाव आणलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोणताही गैरसमज नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार सरकारला आहे आणि कोणीही त्याचा गैरवापर करत नाही. याशिवाय, जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण सध्या सुरू असून, नुकसान भरपाई देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
नदीकिनारी भागांसह इतर ठिकाणीही पावसामुळे नुकसान झाले आहे आणि त्याचेही सर्वेक्षण केले जाईल, असे जारकीहोळी यांनी नमूद केले. महाराष्ट्रातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी दररोज महाराष्ट्र सरकारसोबत सतत संपर्कात आहेत. पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना दिली जाईल, असे जारकीहोळी म्हणाले.