बेळगाव लाईव्ह :उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील श्री हनुमान कुस्तीगीर संघ आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान काल रविवारी कुस्ती शौकिनांच्या उस्फुर्त प्रतिसादात पार पडले. या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकत उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने मानाचा ‘उचगाव केसरी’ किताब पटकाविला.
श्री हनुमान कुस्तीगीर संघातर्फे खास होळी, धुलीवंदन आणि श्री मळेकरनी देवी सप्ताह उत्सवानिमित्त काल रविवारी दुपारी उचगाव येथे भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.
या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती हरियाणा केसरी पै. विशाल (भोंडू) हरियाणा आणि विद्यमान उप महाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांच्यात खेळविण्यात आली. या कुस्तीत प्रारंभीच्या खडाखडीत पै. महेंद्र गायकवाड याने प्रतिस्पर्धी पै. विशाल याच्या ताकदीचा अंदाज घेतला आणि त्यानंतर आपल्या उत्कृष्ट मल्ल कौशल्याचे प्रदर्शन करत पै. विशाल याला आस्मान दाखवून चितपट केले.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत शाहू आखाडा कोल्हापूरचा पै. उमेश चव्हाण यांनी प्रतिस्पर्धी पुण्याचा पै हितेश कुमार याला पराभूत केले. ही कुस्ती श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका अध्यक्ष भारत पाटील आणि हनुमान कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल चौगुले यांच्या हस्ते लावण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. विक्रम शिनोळी आणि पै. प्रकाश इंगळगी यांच्यात खेळविली गेली. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्यामुळे शेवटपर्यंत ही कुस्ती निकाली न होता बरोबरीत सोडविण्यात आली.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै संजय इंगळगी याने प्रतिस्पर्धी पै. कीर्तीकुमार बेनके (कार्वे) याच्यावर विजय मिळविला. उचगावचा पै. प्रणव राजू गडकरी याने 68 किलो वजनी गटाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या पै. जोतिबा माळवे याला चितपट करून चांदीची गदा पटकाविली. ही गदा कै खाचो तेरशे यांच्या स्मरणार्थ ग्रा. पं. अध्यक्षा मधुरा तेरशे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरशे यांनी पुरस्कृत केली होती.
उपरोक्त प्रमुख कुस्त्यांव्यतिरिक्त सदर कुस्ती मैदानात लहान मोठ्या सुमारे 64 चटकदार कुस्त्या झाल्या. काल रविवारी सायंकाळी यशस्वीरीत्या पार पडलेल्या या कुस्ती मैदानाला माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम, श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मयुरा बाळकृष्ण तेरशे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरशे, युवा नेते आर. एल, चौगुले, लक्ष्मण होणगेकर, धनंजय जाधव, बाळासाहेब देसाई, नागेश देसाई, शंकर होणगेकर, मोनाप्पा पाटील, सुनील देसाई, मनोहर होनगेकर, दिलीप देसाई आदी मान्यवरांसह शेकडो कुस्ती शौकिनांनी हजेरी लावून कुस्त्यांचा आनंद लुटला. कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान कुस्तीगीर संघ उजगावच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.