बेळगाव लाईव्ह: नुकताच झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात बेळगाव तालुक्यातील सांबरा गावच्या कन्येने घवघवीत यश संपादन केले आहे.
पी यू सी द्वितीय कला शाखेत लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी सौजन्या सिद्धाप्पा जत्राटी हिने एकूण 600 पैकी 590, (98.33%) गुण मिळवत राज्यात सातवा तर कॉलेज मध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे.
सौजन्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी मुला मुलींची शाळा, सांबरा येथे तर माध्यमिक शिक्षण मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे झाले आहे.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने लिंगराज पदवी पुर्व महाविद्यालय कला विभागात शिकताना
पी.यु.सी. प्रथम वर्षात ९५.८३ टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळविला होता.
तिचे वडील सिध्दाप्पा हणमंत जत्राटी रणझुंझार को-ऑपरेटिव्ह सोसायटी निलजी मध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सांबरासारख्या गावातील मराठी प्राथमिक सरकारी शाळा शिक्षण घेऊन बारावीच्या परीक्षेत राज्यात टॉप टेन मध्ये रँक मिळवलेल्या सौजन्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांबरा प्राथमिक सरकारी मराठी शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्वल केले आहे त्यात सौजन्यासह सायन्स विभागात राशी धर्मोजी 88.% उमा जोई 84%,चांगुणा सोनाजी 76%, गायत्री जत्राटी 76% तर वाणिज्य विभागात तनिषा जोगानी 61% गुण मिळवले आहेत.
सांबरा सरकारी मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन हरजी यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.