बेळगाव लाईव्ह :एकतर्फी प्रेमातून खून झालेल्या हुबळी येथील नेहा या विद्यार्थिनीचे वडील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची त्यांच्या घरी भेट घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष व म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले.
एकतर्फी प्रेमातून हुबळी येथील बी.व्ही.बी. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेहा हिरेमठ हिचा त्याच कॉलेजमधील फैयाज या विद्यार्थ्याने चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे फक्त हुबळीच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगावने देखील सदर घटनेचा काल शनिवारी आंदोलन छेडून तीव्र निषेध केला. त्यानंतर सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आपले सहकारी व अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत थेट हुबळी गाठले. तिथे त्यांनी हुबळी -धारवाड महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले मयत नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
तसेच विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. यावेळी हिरेमठ यांनी आपल्या मुलीवर कोसळलेल्या जीवघेण्याप्रसंगाबाबत थोडक्यात माहिती दिली. तेंव्हा रमाकांत कोंडुसकर यांनी त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच श्रीराम सेना हिंदुस्तान त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी तालुका प्रमुख भरत पाटील, नंदू इंदुलकर ,अनंत पाटील नारू निलजकर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्तान व म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.