बेळगाव लाईव्ह विशेष : सीमाभागात लोकसभा मतदार संघासाठी पहिल्यांदाच बाहेरचा उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. एकीकडे भाजपमधून आयात केलेले ६८ वर्षीय जगदीश शेट्टर तर दुसरीकडे राजकारणात नव्याने आपले नशीब आजमावत असलेले काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर!
भाजपच्या उमेदवाराकडे राजकारणातला मोठा अनुभव तर काँग्रेसच्या उमेदवाराकडे मंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आई आणि आमदार पदी विराजमान असणाऱ्या मामाकडून मिळणारे मार्गदर्शन! आजवर बेळगाव लोकसभा मतदार संघावर सर्वाधिक वर्चस्व भाजपचेच राहिले आहे.
त्यामुळे हे एकंदर चित्र पाहता बेळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची अशी लढली जाणार आहे.
जगदीश शेट्टर यांनी आजवर कर्नाटकाच्या राजकारणात कार्यकाळ गाजविला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले शेट्टर धारवाडचे आहेत. त्यांनी धारवाडचे आमदार पद, विधानसभा अध्यक्षपद, भाजप राज्याध्यक्ष, मुख्यमंत्री पदावर काम केले आहे. तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद दोनवेळा अनुभवले आहे.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सुवर्णविधानसौधची उभारणी केली. तसेच विद्यमान खासदार मंगला अंगडी आणि दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांचे ते व्याही आहेत. राजकारणाची मोठी आणि भक्कम पार्श्वभूमी असणारे शेट्टर हे पहिल्यांदाच बेळगावमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
मृणाल हेब्बाळकर हे गेल्या १० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेस युवा मंडळाची धुरा सांभाळणाऱ्या मृणाल हेब्बाळकरांना त्यांची आई, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे राजकीय मार्गदर्शन मिळत आहे. ग्रामीण मतदार संघातून सलग दोनवेळा विजयी ठरलेल्या हेब्बाळकरांनी बेळगाव जिल्ह्यावर आपली वेगळी छाप पाडली आहे.
त्यांच्या याच अनुभवातून त्यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर हे निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. मृणाल हेब्बाळकर हे पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत त्याचप्रमाणे मृणाल शुगर्स, हर्षा शुगर्स, लक्ष्मीताई सौहार्द सहकारी संस्था, हर्षा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संस्थेची धुराही ते सांभाळतात.
राष्ट्रीय पक्षांचे दोन्ही उमेदवार राजकीयदृष्ट्या सक्षम जरी असले तरी बेळगाव लोकसभा मतदार संघात या दोन्ही उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांची तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. बेळगावमध्ये बहुसंख्येने असलेल्या मराठी समाजाची मते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी असल्याने विविध मुद्द्यावरून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाला आणि काँग्रेसला मराठी भाषिकांच्या मातांपासून वंचित राहावे लागणार आहे.
मराठी भाषिकांच्या मतांचा फरक हा भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या मतांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकतो. यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला पडणाऱ्या मतांमुळे मतांच्या संख्येचे राजकारण हे मोठे आव्हान ठरणार आहे.
१९०४०९९ इतकी मतदार संख्या असणाऱ्या बेळगाव लोकसभा मतदार संघात ५.५ लाख लिंगायत, ३ लाख मराठा, २.८३ लाख अनुसूचित जाती आणि जमाती, २.२० लाख मुस्लिम, १.९० लाख कुरबर, ८० हजार उप्पार, ६० हजार ब्राम्हण, ४५ हजार बंजारा यानुसार ७३ टक्के हिंदू आणि टक्के मुस्लिम समाज अशी जातनिहाय मतदारांची संख्या आहे.
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याच्या मुद्द्याखाली नशीब आजमावत आहेत. लोकसभा क्षेत्रातील ८ पैकी ३ विधानसभा क्षेत्राच्या आमदारांचा पाठिंबा देखील आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या शेट्टरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा घरवापसी केल्यामुळे त्यांना बेळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र स्थानिक पातळीवर उमेदवारीवरून झालेल्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधून अंतर्गत पाठिंबा नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला मृणाल हेब्बाळकर हे कर्नाटक सरकारच्या पाच हमी योजनांचे मुद्दे पुढे करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मृणाल हेब्बाळकर यांच्याकडे पंचमसाली लिंगायत समाजाचे ट्रम्प कार्ड आहे. त्याचबरोबर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या ८ विधानसभा मतदार संघांपैकी ५ विधानसभा मतदार संघातील आमदारांचा पाठिंबाही आहे.