बेळगाव लाईव्ह :मराठा युवक संघ बेळगावच्यावतीने कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित मि. बेळगाव हर्क्युलस -2024 या कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धेतील “मि. बेळगाव हर्क्युलस” हा मानाचा किताब पटकावत कर्नाटकचा प्रताप कालकुंद्रीकर “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन” ठरला.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे गेल्या मंगळवारी रात्री उपरोक्त स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. टायटल विजेत्या कालकुंद्रीकर मागोमाग स्पर्धेचे पहिले व दुसरे उपविजेतेपद अनुक्रमे महाराष्ट्राच्या गुरुनाथ चारगे आणि विशाल गावडी यांनी पटकाविले. भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाच्या नियमानुसार एकूण चार वजनी गटात ही आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली.
प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 10000, 6000, 4000, 3000 व 2000 रुपयांचे रोख पारितोषिक पदकं आणि प्रमाणपत्र बक्षीसादाखल देण्यात आले. त्याचप्रमाणे मि. बेळगाव हर्क्युलस टायटल विजेत्या ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ प्रताप कालकुंद्रीकर याला रोख 21,000 रुपये, आकर्षक करंडक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा विजेता गुरुनाथ चारगे याला 15,000 रुपये आणि द्वितीय विजेता विशाल गावडी याला 11,000 रुपये तसेच करंडक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
तीनही राज्यातील शरीर सौष्ठवपटुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केएबीबीए आणि बीडीबीबीए यांच्यासह मराठा युवक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते) पुढीलप्रमाणे आहे. 60 किलो गट : अवधूत निगडे महाराष्ट्र, गंगाधर स्वामी एचएम कर्नाटक, हमीद खान पठाण गोवा, राहुल प्रसाद गोवा, गजानन गावडे कर्नाटक. 70 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर कर्नाटक,
राजू तेली गोवा, गणेश पाटील कर्नाटक, सुनील भातकांडे कर्नाटक, झाकीर हुल्लूर कर्नाटक. 80 किलो गट : विशाल गावडी महाराष्ट्र, महेश गवळी कर्नाटक, प्रसाद बाचीकर कर्नाटक, रणजीत चौगुले महाराष्ट्र, रवी गाडीवड्डर कर्नाटक.
80 किलो वरील वजनी गट : गुरुनाथ चारगे महाराष्ट्र, समर्थ ढाले महाराष्ट्र, सुजित शिंदे कर्नाटक, अमर गुरव कर्नाटक, काशिनाथ नाईकर कर्नाटक. दुसरा उपविजेता : विशाल गावडी (महाराष्ट्र). पहिला उपविजेता : गुरुनाथ चारगे (महाराष्ट्र). चॅम्पियन ऑफ चॅम्पियन : प्रताप कालकुंद्रीकर (कर्नाटक).