बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात रस्त्यांवर पडलेल्या तसेच इमारती व रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या बिन वापराच्या, निकामी झालेल्या ऑप्टिकल फायबर्सचे प्रमाण वाढत आहे. तेंव्हा दुर्घटनेस निमंत्रण देणाऱ्या या प्रकाराकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या इंटरनेट आणि वायफायचा जमाना असल्यामुळे शहरात सर्वत्र ऑप्टिकल फायबर्सचे जाळे पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या परवानगीने घातल्या जाणाऱ्या या ऑप्टिकल फायबर्स वेळोवेळी बदलल्या जातात.
मात्र नव्या फायबर्स घालताना तोडलेल्या जुन्या ऑप्टिकल फायबर्स संबंधित ठिकाणी तशाच फेकून दिल्या जातात. या फेकून दिलेल्या फायबर वायरिंची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याकडे संबंधित कंपनी आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे सध्या शहरात फायबर वायरिंचा कचरा वाढू लागला आहे. रस्त्यावर पडलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या टाकाऊ ऑप्टिकल फायबर्स ये-जा करणारे नागरिक व वाहन चालकांसाठी अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत.
रस्त्यावर पडलेल्या या वायरिंमुळे ठेचाळणाऱ्या नागरिकांकडून टाकाऊ ऑप्टिकल फायबर्सना कोणी वाली नाही का? असा संतप्त सवाल केला जात आहे.
त्याचप्रमाणे इमारती, रस्ते, रस्त्या शेजारील झाडे वगैरे ठिकाणी लोंबकळणाऱ्या या फायबर वायरिंमुळे शहराच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण होऊ लागली आहे.
तरी महापौरांसह महापालिका आयुक्त आणि याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिनकामाच्या टाकाऊ ऑप्टिकल फायबर्सची समस्या तात्काळ निकालात काढावी, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.