बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत उभारण्यात आलेल्या विविध चौक्यांना जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानियांग यांनी नुकताच भेट देऊन पाहणी केली. यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांतर्गत बाची चेकपोस्ट येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी स्वतः काही वाहनांची तपासणी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, बेळगावची सीमा गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना लागून असल्याने अवैध दारूची तस्करी होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पैसे व विविध वस्तूंच्या अवैध वाहतुकीवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानियांग यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक चेक पोस्टवर उपस्थित राहून तपासणी करावी.चेक पोस्टवर तैनात असलेल्या टीमच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र अनिवार्यपणे परिधान करणे आवश्यक आहे;
प्रत्येक वाहन तपासणी झाल्यानंतर त्याची नोंद रजिस्टरमध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे; वाहनाची तपासणी करताना सौजन्याने वागण्याबरोबरच स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.