बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री मुरुगेश निराणी यांनी कुडलसंगम पिठाचे बसवजयमृत्युंजय यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याने पंचांसाली समाजाचा रोष उफाळून आला आहे.
मुरुगेश निरानि यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बेळगावमध्ये त्यांच्याविरोधात पंचमसाली समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाल्याने आंदोलनकर्त्यांना रोखण्यात आले.
बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्या नाहीत. बेळगाव लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर हे कोणत्या समाजाचे आहेत हे आधी तपासून घ्या आणि नंतरच प्रचार करा असे विधान मुरुगेश निराणी यांनी केले होते. यादरम्यान लक्ष्मी हेब्बाळकर आणि मुरुगेश निराणी यांच्यात जातीवरून शीतयुद्ध सुरु झाले.
यासंदर्भात कुडलसंगम पिठाचे बसवजयमृत्युंजय स्वामी यांनी हस्तक्षेप करत लक्ष्मी हेब्बाळकर या पंचमसाली समाजाच्याच असल्याचे सांगितले. यामुळे मुरुगेश निराणी यांनी बसवजयमृत्युंजय स्वामींना लक्ष्य करत त्यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले.
बसवजयमृत्युंजय स्वामींसोबत कोणताही वैयक्तिक वाद नाही. मात्र त्यांनी आरक्षणाच्या लढ्यावर अधिक लक्ष द्यावे, अन्यथा स्वामींची शंभर काळी गुपिते आपल्याला माहीत असून हि सर्व गुपिते आपण उघड करू असे वक्तव्य मुरुगेश निराणी यांनी केले.
या वक्तव्याविरोधात पंचमसाली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे मुरुगेश निराणी यांना रोष पत्करावा लागला. आज बेळगावमध्ये मुरुगेश निराणी यांच्याविरोधात संताप व्यक्त करत आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.