बेळगाव लाईव्ह : भाजप व काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष स्वार्थी असून सीमाभागातील गोरगरीब जनतेच्या आणि मराठी भाषिकांच्या विरोधात आहेत. सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी आणि आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठी भाषिकांनी समिती उमेदवाराला मतदान करून बहुमताने विजयी करावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचार कार्याचा प्रतिनिधिक स्वरूपातील शुभारंभ शुक्रवारी सकाळी उचगाव (ता. जि. बेळगाव) येथे करण्यात आला. उचगावमध्ये काढण्यात आलेल्या भव्य प्रचार पदयात्रेप्रसंगी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना कोंडुसकर यांनी उपरोक्त आवाहन केले.
गेल्या 65 वर्षापासून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमचा लढा सुरू आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने येथील मराठी भाषिकांना नेहमीच त्रास दिला आहे. मराठी नामफलकांना लक्ष्य करून सीमाभागात कन्नडसक्तीची मोहीम, मराठीतून परिपत्रके देणे टाळणे याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून देशोधडीला लावण्याचा कुटील डाव आखण्यात आला आहे.
भाजप व काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष सीमाभागातील गोरगरीब जनतेच्या आणि मराठी भाषिकांच्या विरोधात भूमिका बजावत असून मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्ष्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे.
समस्त मराठी भाषिकांनी आपले मत महाराष्ट्र एकीकरण समितीला देऊन सीमाभागातील आपली ताकद राज्य व केंद्र सरकारला दाखवून देण्याची हीच वेळ आहे. सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती टिकवायची असेल, मराठीतून परिपत्रके मिळवायची असतील, दुकानांवरील नामफलक मराठीत राहू द्यायचे असतील तर महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ राहून मतदान करावे, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.