Tuesday, May 7, 2024

/

समितीला मिळाला श्री मळेकरणीचा आशीर्वाद

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवीचा आशीर्वाद घेण्याबरोबरच शिवरायांना नमन करून बेळगाव लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आपल्या प्रातनिधीक स्वरूपाच्या प्रचाराचा आज शुक्रवारी सकाळी धडाक्यात शुभारंभ केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्या अनुषंगाने उमेदवार महादेव पाटील यांनी नामांकन अर्ज भरण्यापूर्वी तसेच निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी सर्वप्रथम उचगाव येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्याचप्रमाणे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याद्वारे पाटील यांनी शिवरायांचा देखील आशीर्वाद घेतला.

याप्रसंगी त्यांच्या समवेत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, बेळगाव शहर म. ए. समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, माजी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, उचगावचे समिती नेते लक्ष्मणराव होणगेकर, माणिकराव होणगेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सागर पाटील, गुणवंत पाटील आदींसह कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

देवदर्शनानंतर उमेदवार महादेव पाटील यांची उचगावमध्ये भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे गल्लोगल्ली फटाक्यांच्या आतषबाजीत उस्फुर्त स्वागत करून पाटील यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात येत होता. सर्वत्र सळसळता उत्साह जाणवत होता. गावातील प्रत्येक गल्लीत महादेव पाटील यांना मिठाई भरवण्याबरोबरच सुहासिनींकडून आरती ओवाळून त्यांचे औक्षण केले जात होते.

पदयात्रेप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना उमेदवार महादेव पाटील म्हणाले की, उचगाव येथील श्री मळेकरणी देवी समोर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराचा प्रातिनिधिक दौरा त्या ठिकाणी करत आहे. या गावातील लक्ष्मणराव होणगेकर, माणिकराव होणगेकर आदी प्रतिष्ठित नागरिकांसह समस्त गावकऱ्यांनी अल्पावधीत मोठ्या संख्येने जमवून माझ्यावरील प्रेम व विश्वास व्यक्त केला आहे.

येत्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी करणे म्हणजे कर्नाटक सरकारला चपराक देण्यासारखा आहे. आज बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने जगदीश शेट्टर यांच्यासारखा बाहेरील ‘उपरा’ उमेदवार दिला आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तत्कालीन आमदार कै. संभाजीराव पाटील हे विधानसभेत मराठी नव्हे तर राष्ट्रभाषा हिंदीमध्ये आपले मत मांडत असतानाही शेट्टर यांनी सभापती या नात्याने त्यांच्याशी जे द्वेषपूर्ण वर्तन केले त्याचा व्हिडिओ आज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे त्यावरून बेळगावच्या मराठी भाषिकांविषयी शेट्टर यांना किती आत्मीयता आहे हे दिसून येते. त्यामुळे त्यांना मत द्यायची की नाही याचा विचार मराठी भाषिकांनी करावयास हवा.Mes campeign

दुसरीकडे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांच्या खच्चीकरणासाठी काँग्रेस देखील तितकेच जबाबदार आहे. तेंव्हा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपण मतदान न करता स्वाभिमानाने महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करावे अशी नम्र विनंती करून उमेदवार महादेव पाटील यांनी सर्वजण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला भरघोस मतांनी विजयी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी समिती नेते मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले आणि ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी कशाप्रकारे बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांचा वापर करतात. मराठी भाषिकांवर कशाप्रकारे दडपशाही, अन्याय केला जातो हे स्पष्ट केले. गेल्या सुमारे 70 वर्षापासून बेळगाव कारवार, निपाणी बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील मराठी भाषिक झगडत आहेत.

मात्र आजतागायत एकाही राष्ट्रीय पक्षाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या इच्छेची कदर केलेली नाही. त्यांना त्याची जाणीव करून देणे ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या स्वरूपात मराठी भाषिक सीमावासियांना मिळालेली संधी आहे. तेंव्हा पूर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती न करता त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि समिती उमेदवाराला बहुमताने विजयी करावे, असे आवाहन सदर नेतेमंडळींनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.