शिष्य : गुरुजी, निवडणूक सुरु होण्याच्या उंबरठयावर आहे. प्रक्रिया कोणत्याही क्षणी अधिक वेग पकडू शकते. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. दोन दिवसात समितीचाही अंतिम उमेदवार जाहीर होईल. समितीवर दोन्ही पक्षाकडून दबावतंत्र सुरु आहे असे वाटते का तुम्हाला?
गुरुजी : वत्सा, राष्ट्रीय पक्षांची बेळगाव आणि सीमाभागात स्वतःची स्वतंत्र ताकद नाही, हे यावरून सिद्ध होते. सतत होणारा मराठीवरचा अत्याचार आणि यामुळे मराठी माणसाचे होणारे खच्चीकरण… आता मराठी माणसाचा त्यांना जरी पुळका आला असला तरीही मराठी माणसाच्या जीवावरच त्यांचे यश अपयश अवलंबून असल्यामुळे ते महाराष्ट्र एकीकरण समितीभोवती रुंजी घालत आहेत.
शिष्य : गुरुजी, आमच्या मराठी भाषिकांमधील अनेकजण राष्ट्रीय पक्षांच्या संपर्कात आहेत. तर त्यांच्या माध्यमातून बेळगाव बाहेरून दबाव पडत नसेल का?
गुरुजी : काहीजण जरी संपर्कात असले तरीही त्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीशी सुतराम संबंध येत नाही. कारण महाराष्ट्र एकीकरण समिती हि स्वतःच्या अस्मितेसाठी लढणारी संघटना आहे. कोणीही बाहेरचा माणूस समितीवर दबाव आणू पाहात असेल, तर समिती ते कधीही मानणार नाही. आज समितीने सामान्य माणसाला उमेदवारी देऊन असामान्य अशी कामगिरी करून दाखविली आहे. पूर्वी दगड जरी निवडणुकीला बसवला तरीही निवडून येईल, अशी परिस्थिती समितीची होती. काही आमदार केवळ अर्ज भरून घरी बसायचे तरीही निवडून यायचे. हि समितीची रचना आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष समितीवर जरी दबाव टाकत असतील आणि बाहेरून जरी कुणी समितीवर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा कोणताही परिणाम महाराष्ट्र एकीकरण समितीवर होत नाही. त्याचबरोबर मराठी माणूस हा लढवय्या आहे. ६७ वर्षांचा संघर्ष आहे. या संघर्षाची एक धार आहे. आणि हि धार कमी करण्यास कोणताही मराठी माणूस तयार नाही.
शिष्य : गुरुजी, समिती व्होटबँक शाबूत ठेऊ शकत नाही, असं राजकारणी म्हणत आहेत. काही लोक पसरवत आहेत, राष्ट्रीय पक्षांचा भडीमार सुरु आहे, त्यामुळे समितीने निवडणूक लढवू नये, झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. असंदेखील काहींचं म्हणणं आहे.
गुरुजी : मराठी माणसांची व्होटबँक जर शिल्लक नाही असं जर त्यांचं मत असेल, तर मराठी माणसाच्या पाठीमागे ते लागलेच नसते. दुसरी गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात ज्यापद्धतीने भाजपने शिवसेना संपवायचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी संपवायचा प्रयत्न केला, तसा समिती संपवायचा प्रयत्नदेखील त्यांनी अनेकवेळा करून पाहिला. पण समिती संपली नाही. कारण समिती नैसर्गिक आहे, समितीची ताकद नैसर्गिक आहे, समितीकडे इच्छाशक्ती अफाट आहे. त्यामुळे एखादा गट, काही नेते, काही हस्तक जरी दुसऱ्या दिशेने गेले तरीही समिती मात्र शंभर टक्कर ताकदीने उभी राहिली. कारण मराठी घरात जन्माला येणारं प्रत्येक मूल हे महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता असतो. महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता जो मुळापासून तयार होतो, त्या संघटनेला कोणीही अडवू शकत नाही आणि पाठीमागे रेटू शकत नाही. जरी मरगळ आल्यासारखी वाटत असली तरीही फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊन येणारी हि संघटना आहे.
शिष्य : गुरुजी या निवडणुकीत प्रचारासाठी कोणते मुद्दे घेतले जातील असे वाटते तुम्हाला?
गुरुजी : मुद्दे तर आपले नेहमीचेच आहेत. मराठी माणसाचे हक्क आहेत. जमिनी संपादन, हलगा – मच्छे बायपास, रिंगरोड, मराठी पाट्या यासह मराठी माणसावर नित्यनेमाने, दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत होणारे अत्याचार, मराठी माणसावर सुरु असलेली दडपशाही, सरकारी कार्यालयात मराठी माणसाची होणारी गळचेपी, कन्नड भाषा सक्ती, शैक्षणिक क्षेत्रात झालेले अतिक्रमण या सर्व गोष्टी निश्चितच मराठी माणसाला संघर्ष करण्यासाठी भाग पाडत आहे.
शिष्य : गुरुजी, राष्ट्रीय पक्षामध्ये मराठी माणसाला स्थान नाही. मागीलवर्षी उत्तर मतदार संघातील मराठा समाजातील एकमेव लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक पत्ता कापला. या निवडणुकीच्या प्रक्रियेत मराठा माणूस लोणच्यापुरताही नाही. मराठी माणूस केवळ सतरंज्या उचलणे आणि पताका लावण्यापुरताच उरला आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे?
गुरुजी : सन्मानासाठी अढळ पद मिळविणारा ध्रुव तारा बनला, अशी पूर्वापार ऐकत आलेली गोष्ट आहे. मराठी माणूस हा ध्रुवताऱ्यासारखा आहे…! पण काही लोकांचे तुटणारे तारे, निखळणारे तारे असे स्वरूप आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये अशापद्धतीने खच्चीकरण होणे हि अशा लोकांच्या ऱ्हासाची कारणे आहेत. आणि मग अशा लोकांकडून कोल्हेकुई सुरु होते.. आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाणाऱ्यांचा असाच सन्मान होणार..! समितीच्या कार्यालयात येणाऱ्या साध्यात साध्या माणसालाही सन्मानाने वागवले जाते. म्हणणे ऐकले जाते. बोलण्याची, व्यक्त होण्याची, विचार मांडण्याची संधी दिली जाते. अशी समितीची रचना आहे. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या राजवाड्यात गेल्यानंतर तोच मान मिळणार ना?
शिष्य : गुरुजी उत्तरामध्ये आमदारकी पाच वर्षे भूषविली गेली, त्या लोकप्रतिनिधीला वाटाण्याच्या अक्षता झेलाव्या लागल्या. या लोकप्रतिनिधीच्या पदरात निराशेव्यातिरिक्त काहीच शिल्लक राहिले नाही. होऊ घातलेल्या खासदारकीच्या निवडणुकीतही सर्वकाही हिसकावून घेऊन केवळ वापर करण्यात आला. अशावेळी हे लोक इतक्या निर्लज्जपणे का वागतात? आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज का उठवत नाहीत? यामागचे कारण काय? आपण मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, आपल्या आजवरच्या कारकिर्दीचा वापर करून एखादे पद का मिळवू शकत नाही? आपण एवढे कमकुवत कसे झालो? मराठी समाजामध्ये हि भावना का जागृत होत नाही?
गुरुजी : उत्तर मतदार संघातील मराठी माणसाला याबाबतीत जाणीव करून देणे गरजेचे आहे. दक्षिण मतदार संघातील मराठी माणूस आजही चैतन्याने भारलेला आहे. त्याउलट उत्तर मतदार संघातील मराठी माणूस हळूहळू राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला जात आहे. त्यांची अस्मिता जागरूक करणे गरजेचे आहे, त्यांची अस्मिता त्यांनी जागरूक ठेवणे गरजेचे आहे. जर त्यांनी तशी स्वतःची अस्मिता जागरूक ठेवली नाही, तर हळूहळू त्यांचं मराठीपण संपणार आहे. आणि जेव्हा मराठीपण संपुष्टात येईल, तेव्हा त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. एक काळ असा होता ज्यावेळी ‘त्या’ १८ गल्ल्या सोडून बाकीचा भाग महाराष्ट्रात सामील होणार होता. पण १८ गल्ल्यांसाठी सर्व भागांनी महाराष्ट्रात जाणे टाळले. आम्ही जाऊ तर सर्वांना सोबत घेऊनच! अशी ठाम भूमिका घेतली. आणि आज त्याच १८ गल्ल्यांमधील मराठी माणूस राष्ट्रीय पक्षाच्या प्रवाही गेली.
शिष्य : म्हणजे गुरुजी, या १८ गल्ल्यांमधील मराठी माणसाची अस्मिता वाढणे गरजेचे आहे?
गुरुजी : हो.. त्या गल्ल्यांमधील मराठी माणसाची अस्मिता जागरूक आहे. पण ती अधिक वाढणे गरजेचे आहे.
शिष्य : धन्यवाद गुरुजी… मला माझ्या आसपास घडणाऱ्या महत्वपूर्ण गोष्टींविषयी तुम्ही अमूल्य ज्ञान दिले.. मला जागरूक केले.. माझे डोळे उघडले. माझ्याप्रमाणेच आमच्या नेत्यांचीही डोळे उघडावे, मराठी नेते – राजकारण्यांना सक्षम करावे.. त्यांच्या ज्ञानात भर घालावी, हि विनंती! आपली चर्चा आता निवडणूक संपेपर्यंत होतच राहील.. तूर्तास रजा घेतो… पुन्हा चर्चा करूच…!