बेळगाव लाईव्ह :लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या पार्श्वभूमीवर बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षकांचे जिल्ह्यात आगमन झाले असून ते सार्वजनिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आगमन झालेल्या निवडणूक निरीक्षकांची नावे, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. 02 -बेळगाव लोकसभा संघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून हरक्रीपाल खटाना आणि नरसिंग राव बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी खटाना हे अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर व बेळगाव दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असणार आहेत.
त्याचप्रमाणे नरसिंग राव हे बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती -यल्लमा व रामदुर्ग या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून काम पाहतील. निवडणूक निरीक्षक हरक्रीपाल खटाना (मो. क्र. 7259751395) यांचे वास्तव्य बेळगाव सर्किट हाऊस अर्थात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्राम धामामध्ये सूट क्र. 4 मध्ये असणार असून सार्वजनिकांच्या भेटीसाठी ते सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. दुसरे निवडणूक निरीक्षक नरसिंह राव बी. (मो. क्र. 7348921395) हे देखील बेळगाव सर्किट हाऊस येथेच सूट क्र. 9 मध्ये वास्तव्यास असून ते देखील सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत जनतेला भेटीसाठी उपलब्ध असतील.
01 –चिक्कोडी लोकसभा संघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून एन. मोहन कृष्ण आणि अंकित तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी एन. मोहन हे निपाणी, चिक्कोडी -सदलगा, हुक्केरी व यमकनमर्डी या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असणार आहेत.
त्याचप्रमाणे तिवारी हे अथणी, कागवाड, कुडची व रायबाग या विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून काम पाहतील. निवडणूक निरीक्षक एन. मोहन कृष्ण (मो. क्र. 8971311395) यांचे वास्तव्य तवंदी घाटाजवळील पीडब्ल्यूडी सर्किट हाऊस (ता. हुक्केरी) येथे सूट क्र. 1 (नवा) मध्ये असणार असून सार्वजनिकांच्या भेटीसाठी ते सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.
दुसरे निवडणूक निरीक्षक अंकित तिवारी (मो. क्र. 8904901395) हे देखील तवंदी घाटाजवळील पीडब्ल्यूडी सर्किट हाऊस येथेच सूट क्र. 2 (नवा) मध्ये वास्तव्यास असून ते देखील सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत जनतेला भेटीसाठी उपलब्ध असतील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.