बेळगाव लाईव्ह:ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदेश शेट्टर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करताना अनेक चढउतारांचा सामना केला आहे. पूर्वीच्या जनसंघाचे सदस्य असणारे शेट्टर प्रदीर्घ काळ भाजपसोबत आहेत.
गेल्या कांही वर्षांत त्यांनी पक्ष आणि सरकार अशा दोन्ही ठिकाणी प्रमुख पदांवर काम केले आहे. ज्यामध्ये विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे सभापती या दोन पदांचा समावेश आहे. गेल्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीत हुबळी सेंट्रलमधून भाजपचे तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या शेट्टर यांच्या राजकीय कारकिर्दीला अचानक वळण लागले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मात्र त्यानंतर त्वरेने काँग्रेस सोडून ते पुन्हा भाजपमध्ये आले आणि पक्षाने देखील त्यांचे स्वागत करून सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांना बेळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बहाल केली.
एका विस्तृत मुलाखतीमध्ये जगदीश शेट्टर यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचे कारण काय आहे? आणि पक्षात आपले स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय का घेतला? हे उघड केले. मुलाखतीतील प्रश्न उत्तरे पुढील प्रमाणे… सर्वप्रथम तुमचा निवडणूक प्रचार कसा सुरू आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सर्वत्र प्रचाराने वेग पकडला असून आम्ही प्रत्येक व्यक्तीसह तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांमध्ये जो जबरदस्त विकास साधला आहे तो पाहून देशभरातील जनतेला आणखी एका दशकासाठी मोदींनाच देशाचे पंतप्रधान म्हणून पहावयाचे आहे. बेळगाव मतदार संघात आमच्या प्रचाराला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असे शेट्टर यांनी सांगितले.
गेल्या कांही दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असण्याबरोबरच सहा वेळा आमदार पद भूषवून देखील तुम्ही पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्यास का उत्सुक आहात?
निवडणूक लढवणाऱ्या राजकारण्याला तो आमदार असो वा खासदार याने काही फरक पडतो असे मला वाटत नाही. एच एन अनंतकुमार यांच्यासारखे अनेक राजकारणी आहेत जे राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावरील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. खासदार असून देखील अनेक भाजप नेत्यांनी राज्यातील पक्ष संघटना आणि तिच्या वाढीसाठी कार्य केले आहे. नेत्यांचे (खासदार व आमदार) राजकीय कार्य हे मोठ्या प्रमाणात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते असे जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
भाजपचे निष्ठावंत असून देखील तुम्ही मागील वर्षी पक्ष का सोडलात?
त्यावेळच्या (2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर) राजकीय घडामोडी आणि कांही घटनांमुळे माझ्याकडून ते घडले. त्यासाठी मी त्यावेळी निषेध नोंदवून भाजपला रामराम ठोकला होता. भाजप सोडण्याचा माझा निर्णय अनेक नेत्यांना योग्य वाटला होता आणि आज मी भाजपमध्ये परत आलो हा निर्णय देखील त्यांना योग्यच वाटतो. तसे पाहिल्यास मी फार काळ भाजपपासून दूर नव्हतो. तथापि त्यावेळची परिस्थिती आणि काळाची गरज यामुळे मी तो निर्णय घेतला. आता पुन्हा मी भाजपमध्ये आलो याचा मला आनंद आहे, असे शेट्टर यांनी स्पष्ट केले.
भाजपमधून अल्पकाळासाठी बाहेर पडण्याचा निर्णय या निवडणुकीमधील तुमच्या भावी संभावनांवर परिणाम करू शकतो असे तुम्हाला वाटते का? ते पाऊल उचलण्याची तुम्हाला खंत वाटते का?
मी पुन्हा सांगतो की पक्ष सोडण्याचा निर्णय मी घेतला होता आणि ते घडून गेले. तो एक खराब काळ होता. मात्र आता त्यावेळच्या निर्णयाचे विश्लेषण करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. तसेच त्याबद्दल मला अजिबात खंत वाटत नाही. जेंव्हा मी भाजपमधून बाहेर पडलो, त्यावेळी राष्ट्रीय पक्षांचे नेते माझ्या संपर्कात होते. मी त्यांना प्रतिसाद देऊन भेटण्यासही गेलो. मात्र अखेरीस मी पुन्हा पक्षात परतलो आहे. काँग्रेसमध्ये अल्पकाळ असताना देखील मी कोणावरही विशेष करून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह किंवा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका केली नाही. पक्षावरही टीका केली नाही आणि राष्ट्रीय नेतृत्वाला सवालही केला नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीतील माझ्या संभावनांवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही असे जगदीश शेट्टर म्हणाले.
भाजपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काँग्रेसच्या दबावाचा सामना करावा लागला का?
भाजप सोडण्यापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता मी खरोखर अस्वस्थ झालो होतो आणि त्यांनी (काँग्रेस) मला त्यावेळी काँग्रेसमध्ये येण्यास सांगितले. मला दुसरा कोणताही विचार नव्हता आणि मी त्या पक्षात सहभागी झालो, असे शेट्टर यांनी नमूद केले.
कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर तुम्ही बेळगाव मधून लोकसभा निवडणूक लढवत आहात?
आगामी निवडणुकीत मोदी हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामुळे पक्षाला चांगली कामगिरी करता येईल. लोकांच्या मोदींवर आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या आशा आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती साधत आहे हे ते पाहत आहेत. त्यांनी केलेल्या सुधारणा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाने लोकांना प्रभावित केले आहे. वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू करणे आणि हवाई सेवा सुधारण्यासाठी अनेक योजनांचा शुभारंभ या गोष्टी येत्या निवडणुकीत पक्षाला मदत करतील, असे शेट्टर म्हणाले.
बेळगाव मतदार संघात जातीचा मुद्दा महत्त्वाची भूमिका निभावत असतो. यावेळी प्रबळ लिंगायत समुदायाची मते विभागली जाण्याची भीती तुम्हाला वाटते का?
जर तुम्हाला भूतकाळातील घडामोडी आठवल्या तर तुम्हाला असे दिसून येईल की लोकसभेच्या निवडणुका मुख्यत्वे करून राष्ट्रीय मुद्द्यांवर लढल्या गेल्या आहेत, इतर मुद्द्यांवर नाही. या निवडणुकीत लोक प्रामुख्याने राष्ट्रीय नेतृत्व, पंतप्रधानांचा उमेदवार वगैरेंचा विचार करतात. जात किंवा इतर मुद्दे हे विधानसभा किंवा पंचायत निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात, असे जगदीश शेट्टर यांनी शेवटी सांगितले.