बेळगाव लाईव्ह:रिंगरोड, बायपास, रेल्वे रूळ प्रकल्प यासारख्या प्रकल्पामध्ये आधीच बहुसंख्य मराठी शेतकरी भरडले जात असतानाच दुसरीकडे हेस्कॉमनेही कारवाईचा बडगा उगारत मराठी शेतकऱ्यालाच लक्ष्य केल्याचा प्रकार आज समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खादरवाडी येथील कृष्णा मल्लप्पा पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी पंपसेट बसविला आहे. मात्र हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे येऊन सदर पंपसेटच्या माध्यमातून बेकायदेशीर वीज उपसा केल्याचा आरोप करत पंपसेट जप्त करून सदर शेतकऱ्याला दंडाची रक्कम भरण्याचे सांगितले.
यावेळी कृष्णा पाटील आणि इतर शेतकऱ्यांची उपस्थित हेस्कॉम अधिकाऱ्यांशी वादावादीही झाली. या प्रकाराबाबत हेस्कॉमने कोणतीही नोटीस न देता कारवाई केली असून याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याची तयारीही शेतकरी कृष्णा पाटील यांनी दाखविली आहे.
सध्या कृष्णा पाटील यांच्या शेतात मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, भेंडी यासह इतर भाजीपाल्याचे पीक घेण्यात येत आहे. भर उन्हात पिकाला पाणी देतेवेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे येऊन वीज जोडणी कापल्याने कृष्णा पाटील अडचणीत सापडले आहेत.
कारवाईसाठी आलेल्या हेस्कॉम अधिकाऱ्याने शेतकऱ्यावरच दादागिरी केल्याचे दिसून येत असून रिंगरोड, बायपास पाठोपाठ आता हेस्कॉमनेही शेतकऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चा होत आहे. सदर शेतकऱ्याला १२७०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.