Saturday, July 27, 2024

/

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्यांची जोरदार निदर्शने

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात आज बेळगावमध्ये कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या शेतकऱ्यांनी मानवी साखळी तयार करून मंगळवारी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने केली.

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकार आणि जिल्हा प्रशासन दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ आज कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने छेडलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज हाती घेण्यात आलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांचा रोष पाहून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॅरिकेड्स बंद करून शेतकऱ्यांना रोखण्याची वेळ आली.

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यात प्रशासन दिरंगाईचा पवित्रा उचलत आहे. दुष्काळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने तातडीने दुष्काळी मदत द्यावी, केंद्र सरकारने एकरी 50 हजार रुपये तर राज्य शासनाने एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी यावेळी केली.

यावेळी काही शेतकऱ्यांनी काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यामुळे आपल्याला अनुदान मिळत नसल्याचा आरोप केला. भाजप सरकार अस्तित्वात असताना गोशाळेमुळे अनुदान मिळायचे मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अनुदान मिळणे बंद झाले आहे. शेतकऱ्यांच्या या दयनीय अवस्थेचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

शेतकऱ्यांना बॅरिकेड्स लावून अडविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला होता. यावेळी शेतकऱ्यांना धक्काबुकी झाल्याचेही प्रकार घडले. शिवाय शेतकऱ्यांची वाहने देखील अडविण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन केले असता अखेर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, कर्नाटकातील कृष्णा नदीला पाणी सोडण्यासाठी कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या जलविभागाच्या सचिवांची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात महाराष्टातील कोयना धरणातील पाणी कर्नाटकातील कृष्णा नदीला सोडण्यासाठी महाराष्ट्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.