बेळगाव लाईव्ह : हलगा – बस्तवाड ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी पी. श्वेता यांच्याविरोधात विविध आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून सदर पिडिओंवर त्वरित कारवाई करून त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी केली आहे.
हलगा-बस्तवाड ग्रामपंचायतीत गेल्या ११ वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजाविणाऱ्या पी. श्वेता यांनी रोजगार हमी योजनेत बेकायदेशीर रित्या काम केल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
सरकारी निधीतून येणाऱ्या कामकाजासंदर्भात बेकायदेशीर काम केल्याचा ठपका काही ग्रामस्थांनी त्यांच्यावर ठेवला आहे. गावातील सर्वसामान्य जनतेला योग्य माहिती न देणे, पैशाच्या हव्यासापोटी चुकीची माहिती देऊन बेकायदेशीर कामे करणे,
निधीचा योग्य वापर न करणे,बेकायदेशीर लेआऊट ना परवानगी देणे, सर्वसामान्यांचे पैसे घेऊन बॉण्ड डीडमध्ये ई-प्रॉपर्टी दर्शवून ग्रामस्थांमध्ये वाद घडवून आणणे असे प्रकार त्यांच्याकडून केले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर ग्रामविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची तातडीने अन्यत्र बदली करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.