बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टच्या ठिकाणी कडक तपासणी केली जावी. पैसे, दारू अथवा इतर वस्तूंच्या बेकायदा वाहतुकीला आळा घालून त्वरित कारवाई केली जावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये काल मंगळवारी आयोजित लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी (डीसी) पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चेकपोस्टच्या ठिकाणी ये -जा करणाऱ्या वाहनांची अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे तपासणी करावी.
वाहनातून रोख रक्कम घेऊन जात असल्यास त्या संदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जावी असे सांगून वाहन तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र घालणे सक्तीचे आहे, अशी सूचना बैठकीत केली. बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणारी रोख रक्कम अथवा दारू ताब्यात घेतल्यास त्याची माहिती त्वरित वरिष्ठ अधिकारांना देण्यात यावी, असे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
बेकायदेशीरित्या बॅनर लावले जात असले तरी त्यावर कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भातील ठिकाणी भांडणे झाले असून प्रकरणांची नोंद झाली आहे. याबाबत अतिदक्षतेने नजर ठेवून बेकायदेशीर बॅनरवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
बैठकीस महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश, कृषी खात्याचे संचालक शिवणगौडा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डाॅ. महेश कोणी, जि. पं. योजना अधिकारी गंगाधर दिवीटर, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, तहसीलदार सिद्राय भोसरी, पशु संगोपन खात्याचे उपसंचालक राजीव कुलेर आदींसह जिल्ह्यात निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.