बेळगाव लाईव्ह : गेल्या १० वर्षांपासून हलगा – मच्छे बायपाससाठी धडपड सुरु असून शेतकऱ्यांचा विरोध आणि उच्च न्यायालयाची स्थगिती असूनही गुरुवारी पोलीस बंदोबस्तात बायपासचे काम सुरु करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री या रस्त्यावर कंत्राटदाराने यंत्रसामग्री आणून उभी केली. बुधवारी सकाळी हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्या कंत्राटदाराला जाब विचारला. सदर यंत्रसामग्री तातडीने हटविण्यासाठी शेतकऱ्यांनी तगादा लावल्याने कंत्राटदाराने तेथून काढता पाय घेतला होता, मात्र शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता गुरुवारी पुन्हा बायपासचे काम सुरु करण्यात आले आहे.
यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहेत. दुष्काळ, पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून शेतकरी तणावाखाली वावरत आहेत. असे असूनही शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेता, बायपासचे काम सुरु करण्यात आले आहे.
न्यायालयाने रीतसर स्थगितीचा आदेश दिला असून न्यायालयाचा अवमान करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी याप्रकरणी उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. बायपासच्या कामासाठी आणण्यात आलेल्या जेसीबीखाली जीव देऊ, आत्मदहन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र कंत्राटदारांनी या गोष्टीलाही न जुमनाता कामकाजाला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांनी रितसर न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी स्थगिती दिली असून या जागेमध्ये कोणालाही अतिक्रमण किंवा विकास करता येणार नाही. जर कोणी अशाप्रकारे दडपशाही करत रस्ता करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो न्यायालयाचा अवमान ठरणार आहे.
जर कोणीही अशाप्रकारे अवमान करत असतील तर त्याविरोधात पुन्हा शेतकऱ्यांच्यावतीने अवमान याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती ज्येष्ठ वकील रवीकुमार गोकाककर यांनी दिली आहे.