Thursday, May 2, 2024

/

बेळगावमध्ये बॅनरबाजीच्या राजकारणाला सुरुवात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राजकीय बॅनर बाजी या अगोदर आपण शिवसेना मनसे भाजप शिवसेना अशी मुंबईत अनेकवेळा बघितली आहे नेमक्या अश्याच पद्धतीची राजकीय बॅनर बाजी बेळगावात देखील पहायला मिळू लागली आहे.

निवडणुका जवळ आल्या कि संपूर्ण शहर आणि परिसरात बॅनरबाजीला ऊत येतो. राजकारणात प्रवेश घेणाऱ्या नवोदितांपासून, इच्छुक उमेदवार ते राजकारणात सक्रियपणे कार्य करणाऱ्या नेतेमंडळींसह दिग्गजांचे फलक राजकीय हेतूने झळकत असतात. मात्र बॅनरबाजीतून विरोधकांना शह देण्याची पद्धत अलीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महाराष्ट्रात बॅनरबाजीतून विरोधकांवर टीका करण्याचे प्रकार राजरोसपणे घडतच असतात. मात्र आता महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावमध्येही बॅनरबाजीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. आज बेळगावमधील सरदार्स मैदानावर भाजपचे बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी बॅनरबाजीतून विरोधकांना टोला लगावत ‘मेरा परिवार, मोदी परिवार’चा नारा दिला आहे.

परिवार वाद म्हणजे काँग्रेस – गांधी परिवार, समाजवादी पार्टी – यादव परिवार, शिवसेना – ठाकरे परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस – पवार परिवार, आर.जे.डी. – लालूप्रसाद यादव आणि परिवार, नॅशनल कॉन्फरन्स अब्दुल्ला परिवार अशा पद्धतीने घराणेशाहीतच राजकारण सुरु असून सध्या बेळगावच्या राजकारणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, त्यांचे बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आता लोकसभेसाठी त्यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांचे नाव आघाडीवर असून इतर कार्यकर्त्यांनी भजन करायचे का? असा सवाल धनंजय जाधव यांनी या फलकाच्या माध्यमातून जाहीरपणे विचारात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या राजकारणात वादग्रस्त मुद्दा उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.

 belgaum

सरदार्स मैदानावर झळकत असणारा हा भलामोठा बॅनर सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षात घराणेशाहीवर आधारित उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात या फलकावर मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. बेळगावच्या राजकारणाची चर्चा राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यातून निवडणुका जवळ आल्या कि राजकारणात वर्चस्व असणाऱ्या मोजक्याच नेतेमंडळींच्या समर्थकांना उमेदवारी दिली जाते, हे जगजाहीर आहे. बेळगावच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्वाचा पैलू असणारे जारकीहोळी कुटुंब त्यापाठोपाठ कत्ती, जोल्ले, हुक्केरी कुटुंबालाच आजवर राजकारणात संधी देण्यात आली आहे. मात्र कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेसने बेळगाव लोकसभा मतदार संघ काबीज करण्यासाठी विद्यमान आमदार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारातून त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. यामुळे आजवर घराणेशाहीचा इतिहास असणाऱ्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे.Banner war

भाजपच्या धनंजय जाधव यांनी बॅनरबाजीतून राजकारणाला सुरुवात जरी केली असली तरी भाजपने गेल्या काही निवडणुकीत उमेदवारीसंदर्भात घेतलेले निर्णय पाहता धनंजय जाधव यांना विरोधकांवर अशापद्धतीने टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. दिवंगत खास. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांचा विरोध डावलून मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली.

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली. जोल्ले कुटुंब देखील घराणेशाहीचेच एक उदाहरण. राज्याच्या राजकारणात भाजपने देखील अनेकठिकाणी घराणेशाचेच राजकारण केले. मात्र असे असतानाही धनंजय जाधव यांनी कोणत्या नैतिकतेतून हि बॅनरबाजी केली? असा सवालही विरोधकांसह जनतेतून उपस्थित केला जात आहे.

सरदार मैदानावर लागलेल्या या राजकीय बॅनर मध्ये मात्र कन्नड आणि मराठीला अर्धे अर्धे स्थान देण्यात आले असून 60 टक्के कन्नड आणि 40 टक्के इतर भाषा असा शासनाच्या कायद्याचे पालन करण्यात आलेले नाही. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांना मराठी भाषिकांची मते हवी असतात जनतेला कळू देत या उद्देशातून दोन्ही भाषेत अर्धे अर्धे बॅनर लावले असावेत इथे कायदा का पाळला जात नाही असा खोचक सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.केवळ मतासाठी मराठी हवी का? का कन्नड सक्ती वर एक चक्कार शब्द देखील दोन्ही पक्ष काढत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.