Thursday, December 19, 2024

/

जिल्ह्यातील ३०० गावांवर पाणी टंचाईचे गडद सावट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यामध्ये भविष्यात सुमारे ३०० गावांमध्ये पावसाअभावी पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायतकडून पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे.

खासगी कूपनलिका व विहिरींच्या पाण्याबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर खरेदीची सूचना करण्यात आली आहे. मात्र, ग्रा. पं. कडे अनुदान उपलब्ध नसल्याने टँकर खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीनुसार ३०० गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने भविष्यातील नियोजनासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका व विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मार्चपासूनच अनेक गावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.

विहिरींच्या पाणीपातळीत झालेली घट पुढील संकटाचे सूचक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे एप्रिल-मे दरम्यान पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.Water tap

जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या बहुग्राम पाणीपुरवठा योजना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदी पात्र कोरडे पडत आहे. त्यामुळे बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बेळगाव तालुक्यासह रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी आदी तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर गावांचा समावेश पाणी टंचाईच्या झोनमध्ये करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाकडून खासगी कूपनलिका व विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागले आहे.

त्यामुळे अशा विहिरी व कूपनलिका भाडे तत्त्वावर घेण्याची सूचना तालुका पंचायतींना करण्यात आली आहे. तर तालुका पंचायतीकडून ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना व ग्रा. पं. सदस्यांना विहीर व कूपनलिका मालकांशी संवाद साधून पाणी भाडे तत्त्वावर घेण्यासाठी बोलणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.