बेळगाव लाईव्ह:बेळगावचे धडाडीचे यशस्वी युवा उद्योजक जयदीप गोपाळराव बिर्जे यांच्या स्टीम टर्बाइन बनविण्यात स्पेशालिस्ट अर्थात निपुण असलेल्या लिओ इंजिनियर्स या कंपनीने लघुउद्योग भारती बेंगलोरचा स्टार्टअप श्रेणीतील यंदाचा प्रथम क्रमांकाचा ‘एमएसएमई अवॉर्ड्स -2024’ हा पुरस्कार पटकावला असून औद्योगिक क्षेत्रातील बेळगावचा नावलौकिक आणखी वाढवला आहे.
लघु उद्योग भारती बेंगलोर उत्तर आणि आयएमएस फाउंडेशन यांच्यातर्फे हॉटेल ताज, यशवंतपुर बेंगलोर येथे काल मंगळवारी सकाळी यंदाच्या एमएसएमई अवॉर्ड्स -2024 या दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बेंगलोर दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या. ऐस डिझायनर्स बेंगलोरचे संस्थापक संचालक पी. रामदास, बीसीआयसी बेंगलोरचे अध्यक्ष डॉ. देवराजन यांच्यासह सन्माननीय अतिथी म्हणून लघुउद्योग भारती कर्नाटकचे अध्यक्ष सचिन सबनीस आणि लघुउद्योग भारती बेंगलोर उत्तरचे अध्यक्ष संजय भट उपस्थित होते.
सदर सोहळ्यात उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते जयदीप बिर्जे यांच्या उद्यमबाग बेळगाव येथील लिओ इंजिनियर्स कंपनीला स्टार्टअप श्रेणीतील ‘एमएसएमई अवॉर्ड्स -2024’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बेळगावात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योजक आहेत. त्यात जयदीप गोपाळराव बिर्जे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. बेळगावमध्ये त्यांनी 2015 मध्ये लिओ (लास्टिंग एनर्जी ऑप्शन) ही कंपनी सुरू केली. या कंपनीकडून स्टीम टर्बाइनचा पुरवठा, सेवा, दुरुस्ती, बदल व पार्ट्स पुरविण्याचे काम केले जाते. स्टीम टर्मिनला कोणत्याही कंपनीचे हृदय मानले जाते. म्हणूनच लिओ ही कंपनी युनिक म्हणून ओळखली जाते.
वार्षिक 5 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या लिओ इंजिनियर्स कंपनीने अनेकांना रोजगार दिला आहे. बेळगावच्या औद्योगिक वसाहतीला नवीन कांहीतरी देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या कंपनीने अल्पकाळात यशाचे शिखर गाठले आहे. लिओ 2017 पासून साखर, फार्मास्युटिकल, फूड प्रोसेसिंग उद्योगांना स्टीम टर्बाइनची सेवा देत आहे. लिओचे एक कार्यालय युक्रेनला असून केनियात सर्व्हिस स्टेशन आहे. त्यांनी कागल, वर्धन ऍग्रो खटाव, मार्कंडेय शुगर काकती आदींसह सिलिगुडी, दार्जिलिंग, मोझांबिक, युक्रेन, म्यानमार, दुबई, सिंगापूर या देशात टर्बाइन पुरवठा केला आहे. जर्मनीतील कंपनीकडून स्टीम टर्बाइन पॅकेज घेऊन कंपन्यांना त्याचा पुरवठा केला जातो. बेळगावात लिओ कंपनीकडे दुरुस्तीसाठी टर्बाइन येतात, ते महिनाभरात दुरुस्त करून दिले जाते. तीन मेगा बॅटच्या नवीन टर्बाइनची किंमत 3 कोटी रुपयांपर्यंत आहे. एका टर्बाइनमध्ये सुमारे 1000 पार्ट्स असतात. बेळगावातील उद्योजकांनी आपल्या कंपनीत टर्बाइन बसवून घेतल्यास त्यांची कोट्यावधी रुपयांची बचत होणार आहे. जयदीप बिर्जे यांनी आतापर्यंत जर्मनी, यूक्रेन, श्रीलंका वगैरे ठिकाणी व्यवसाय दौरे केले आहेत.
त्यांचा स्टार्ट अप इंडिया कोर्स झाला आहे. या माध्यमातून त्यांनी 20 हून अधिक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांची नीती आयोगावर रीजनल मेंटॉर म्हणून निवड झाली आहे. ठळकवाडी हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या जयदीप यांनी हल्ल्याळमधील केएलएस इन्स्टिट्यूट मधून बी.ई. मेकॅनिकल पदवी संपादन केली आहे.
त्याचप्रमाणे सिम्बॉयसिस मधून पीजी डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सामाजिक कार्यात देखील ती अग्रेसर असतात. लिओ इंजिनियर्सला यंदाचा ‘एमएसएमई अवॉर्ड्स -2024’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जयदीप बिर्जे यांचे बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.