Thursday, January 23, 2025

/

‘रोटरी’च्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावमधील कॅंटोन्मेंट परिसरातील मटन बुचर स्ट्रीट टॉयलेट ब्लॉक आणि स्टाफ कॉर्टर्स ओल्ड पोस्ट ऑफिस रोड येथील रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या सांडपाणीशुद्धीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 यांच्या नेतृत्वाखालील हा दूरदर्शी प्रकल्प संबंधित परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येचे निवारण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मटन बुचर स्ट्रीट टॉयलेट ब्लॉक जवळ आणि स्टाफ क्वार्टर्स ओल्ड पोस्ट ऑफिस रोड जवळ अशा दोन महत्त्वाच्या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांचे भूमिपूजन आज सकाळी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. जयदीप सिद्दण्णावर, जिल्हा प्रांतपाल रो. शरद पै, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीवकुमार, अशोक आयर्न्सच्या जयभारत फाउंडेशनचे रो. अशोक परांजपे, रो. पराग भंडारे, रो. मिलिंद पाटणकर आदींच्या हस्ते उत्साहात पार पडले.

दररोज 1,35,000 लिटर सांडपाण्यावर प्रभावीपणे प्रक्रिया करण्याच्या संयुक्त क्षमतेसह हा परिवर्तनकारी उपक्रम परिसरातील कचरा किंवा दूषित पाण्याचे सुरक्षित स्त्रोतामध्ये रूपांतर करून पर्यावरण प्रदूषणाचा सामना करण्यास उपयुक्त ठरेल. विशेष करून स्नानगृहे, रस्ते स्वच्छता तसेच फिश मार्केट, मटण मार्केट, बागा, शौचालय आदिसाठी उपयुक्त ठरणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना रोटरी जिल्हा प्रांतपाल रो. शरद पै यांनी सदर प्रकल्पांतर्गत मिळणाऱ्या पाण्याचा वापर येथील फिश मार्केट, मटण मार्केटला करता येईल असे सांगून या प्रकल्पाची कॅन्टोन्मेंट बोर्डाने देखभाल योग्यरीत्या करावी अशी विनंती कॅंटोन्मेंट बोर्डच्या सीईओंना केली. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. जयदीप सिद्दण्णावर आणि रो. पराग भंडारी यांनी या प्रकल्पाची अधिक माहिती देताना ससदर प्रकल्पांतर्गत सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते कॅम्पमधील फिश मार्केट, मटण मार्केट, बागा, शौचालय आदी ठिकाणी वापरता येईल. यासाठीच दोन सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दोन्ही प्रकल्पांचे काम 3-4 दिवसात सुरु होईल, असे स्पष्ट केले.Rotary club

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे, अंतर्जल पातळी वाढविणे आदी महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी क्लब, लायन्स क्लब व प्यास फौंडेशन आदींच्या सहकार्याने राबविण्यात येत आहेत.

लोकसहभागातून असे प्रकल्प राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीवकुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले. भूमिपूजनाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे मनोज मायचेल, सतीश मन्नूरकर, प्रवीण देशपांडे, अशोक पै, कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य सुधीर तुपेकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.