बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील पाणी संवर्धनाचे महत्त्व जाणणाऱ्या कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आज शनिवारी सकाळी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून आगळ्या पद्धतीने रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.
पूर्वापार प्रथेनुसार होळी रंगपंचमीच्या सणानंतर पाच दिवसांनी शहरातील शहापूर येथे रंगोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार विविध रंगांची उधळण करत शहापुरात रंगपंचमी साजरी केली जात आहे.
रंगपंचमीच्या निमित्ताने पाण्याची प्रचंड नासाडी होत असते. हे लक्षात घेऊन पाण्याचे महत्व जाणून उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या संवर्धनासाठी शहापूरचे कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान दरवर्षी रंगपंचमी दिवशी स्तुत्य पुढाकार घेत असते.
लोकांनी रंगपंचमीच्या निमित्ताने पाण्याची नासाडी न करता अन्य मार्गाने रंगोत्सवाचा आनंद लुटावा हा संदेश देण्यासाठी सदर प्रतिष्ठानतर्फे गेल्या बऱ्याच वर्षापासून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून आगळ्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली जाते. त्यानुसार शहापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज शनिवारी सकाळी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित आजच्या या रंगपंचमी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर हे उपस्थित होते. त्यांच्यासह उपस्थित सर्वांनी फुलांच्या पाकळ्याची उधळण करून रंगपंचमी साजरी केली.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालोजीराव अष्टेकर, उपाध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव, अमृत भाकोजी, यल्लाप्पा कोलकार, हिरालाल चव्हाण, मनोहर होसुरकर, प्रभाकर भाकोजी, अशोक चिंडक, रमेश सोंटक्की, राजू सुतार, बाबू दिवटे, संजय किल्लेकर, राजाराम सूर्यवंशी, नगरसेवक रवी साळुंके, शाहू शिंदे, दशरथ शिंदे, केतन भाकोजी, श्रीधर (बापू) जाधव, सुरज लाड, सुरज कडोलकर, विजय जाधव, साईराज जाधव, पी. जी. घाडी, गंगाराम शिंगे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.