बेळगाव लाईव्ह :वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल राजकिरण पाटील यांनी गंभीर अवस्थेत एका दिवसाच्या नवजात अर्भकाच्या मदतीसाठी धावून जात रक्तदान करण्याद्वारे त्याचा जीव वाचवल्याची घटना आज घडली.
बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील संबंधित अर्भक हायपरबिलिरुबिनेमिया (हेमोलाइटिक कावीळ) या आजाराशी झुंज देत असून त्याला तात्काळ ताज्या रक्ताची गरज होती.
त्या संदर्भात बीम्स रक्तपेढी बेळगाव येथून आज शनिवारी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांचा तातडीचा फोन आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल राजकिरण पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलकडे धाव घेतली.
तसेच त्या ठिकाणी त्वरेने रक्तदान करून त्या नवजात अर्भकाचा बहुमूल्य जीव वाचवला. पोलिस कॉन्स्टेबल राजकिरण पाटील यांचे त्वरित प्रतिसाद देऊन केलेले हे निःस्वार्थ दयाळू कृत्य मानवतेचा खरा आत्मा प्रतिबिंबित करणारे समाजसेवा आणि करुणेचे एक उज्ज्वल उदाहरण म्हणावे लागेल.
गरजूंना मदत करण्यासाठी तयार असण्याचे महत्त्व पाटील यांच्या अर्भकाचा जीव वाचवण्याच्या कृतीतून दिसून येते.