Saturday, April 27, 2024

/

शिवरायांच्या अवमानाचा जाब विचारण्याची हीच वेळ : रमाकांत कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप असो किंवा काँग्रेस दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आजवर छत्रपती शिवरायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत बसवेश्वर महाराजांचा राजकारणापुरता वापर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षातील कार्यकर्त्यांनी याचा जाब नेत्यांना विचारावा असे आवाहन समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवभक्तांच्या माध्यमातून मागील वर्षी शिवसन्मान पदयात्रा काढण्यात आली. शहरातील मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांसह संत बसवेश्वर महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांची सन्मानपूर्वक स्थापना करण्यात यावी, यासाठी विविध संघटनांच्या सहकार्यातून आंदोलन छेडण्यात आले.

दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी महापुरुषांचा अवमान केला आणि अद्याप या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या नाहीत. राष्ट्रपुरुषांच्या आदर, आसक्ती असेल तर स्वाभिमानाने या प्रतिमा रेल्वेस्थानकावर बसविणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रीय पक्षांनी याबाबत उदासीनता दाखवली. मणगुत्ती येथे शिवमूर्ती हटविण्यात आली.

 belgaum

त्यावेळी मोठा तणाव निर्माण झाला. बेंगळुरू येथील शिवमूर्तीची विटंबना झाली. बेळगावमधील सह्याद्री नगर येथील शिवमूर्ती रातोरात हटविण्यात आली. मात्र या कोणत्याही घटनेत राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी शिवभक्तांना न्याय दिला नाही. उलट बेंगळुरू येथे झालेल्या घटनेनंतर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या बेळगावमधील शिवभक्तांना अटक केली. कारागृहात डांबले.Mes politics

हिंदुत्ववाद करणारे भाजप असो किंवा काँग्रेस दोन्ही पक्षांनी मराठी भाषिकांना आणि शिवभक्तांना न्याय दिला नाही. मराठी भाषिकांवर कर्नाटक प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायावेळी कधीच या नेत्यांनी मराठी भाषिकांच्या पाठीशी उभं राहण्याचे सौजन्य दाखविले नाही. अशा राष्ट्रीय पक्षांना आता शिवभक्तांनी जाब विचारावा. शिवरायांचा झालेला अवमान यावर नेत्यांनी आता बोलावं यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावावा. मराठी भाषिकांवर होणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी नेत्यांना जाब विचारावा. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे.

त्यामुळे मनपासमोरील हटविण्यात आलेल्या भगव्याबद्दल जाब विचारावा. निवडणुका जवळ येताच भगवा ध्वज, भगव्या पताका आणि भगवा फेटा राष्ट्रीय पक्षांना कसा आठवतो? याचाही जाब विचारावा आणि येणाऱ्या काळात मराठी भाषा, मराठी भाषिक आणि मराठी संस्कृती सीमाभागात अबाधित ठेवण्यासाठी समितीच्या बाजूने उभं राहावं, असे आवाहन समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.