बेळगाव लाईव्ह :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला जागे करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे सीमाप्रश्न आणि कन्नड सक्ती संदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय प्रमुखांना पत्रे लिहिण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आपल्या या उपक्रमा संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते धनंजय पाटील म्हणाले की, म. ए समितीचे कार्यकर्ते या नात्याने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना आम्ही सीमाप्रश्नी आणि कन्नड सक्ती विषयी पत्रं धाडत आहोत.
लोकसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. देशभरात लोकशाहीचा हा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रातील नेत्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करताना सीमावासियांना विसरून चालणार नाही. सीमाबांधव गेली 68 वर्षे महाराष्ट्रात जाण्यासाठी आटापिटा करत आहे. मात्र येथील कन्नड सक्तीचा वरवंटा अधिकच तीव्र होत आहे. कर्नाटक सरकारने 1986 साली बेळगावसह सीमाभागात शैक्षणिक दृष्ट्या कन्नड सक्ती लागू केलीच, मात्र आता गेल्या महिन्याभरापासून व्यावसायिक दृष्ट्या देखील कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवण्यास सुरुवात केली आहे. याची दखल महाराष्ट्रातील नेत्यांनी गांभीर्याने घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब, ठाकरे मनसेचे राज साहेब ठाकरे, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर वगैरे प्रमुखांना आम्ही पत्रे पाठवत आहोत.
महाराष्ट्रात जो जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे, त्यामध्ये सीमाप्रश्न आणि येथील कन्नड सक्तीचा विषय प्राधान्याने आला पाहिजे. तसेच तुमचे उमेदवार जेंव्हा जाहीर सभेत भाषण करतील तेंव्हा त्यांनी या गोष्टींचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला पाहिजे. ज्यामुळे महाराष्ट्रात सीमाप्रश्नाची चळवळ पुन्हा उभी होण्यास मदत मिळेल अशा आशयाचा तपशील पत्रात नमूद असून सर्वपक्षीय उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली.
तसेच निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी सीमाप्रश्न आणि कन्नड सक्तीचा विषय लोकसभेत देखील मांडावा. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही त्या सर्व उमेदवारांना ई-मेलद्वारे आमची ही पत्रे पाठवणार आहोत आणि त्यांनी त्या पत्राची दखल घ्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे, असे धनंजय पाटील यांनी सांगितले.