बेळगाव लाईव्ह :खादरवाडी येथील श्री बक्कापा देवस्थान असलेल्या 42 एकर जमिनीसंदर्भात सर्वांगाने सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी आज शनिवारी दिले. तथापि आपल्यावर अन्याय झाल्यास सामूहिक आत्महत्या करू असा इशारा खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या 42 एकर जमिनीच्या बाबतीत गैरव्यवहार झाला आहे. सदर जमीन भूमाफीयांच्या घशात घालण्याचा कट रचण्यात आला आहे असा आरोप करण्याबरोबरच या जमिनीच्या व्यवहारांमध्ये कमिटी व वारसदाराने कब्जेदार शेतकऱ्यांच्या विकलेल्या जमिनीचे पैसे मिळालेले नाहीत.
कब्जेदार शेतकऱ्यांना फसवून जो 108 एकरचा व्यवहार वारसदार आणि वारी कमिटीने केला आहे तो रद्द करावा, अशी शेतकरी व गावकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी आज शनिवारी खादरवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत महसूल निरीक्षक पकाले आणि तलाठी हनुमंत मसाला हे देखील उपस्थित होते. प्रारंभी गावकऱ्यांच्यावतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांनी श्रीफळ वाढवून श्री बक्कापा देवाची पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना तहसीलदार भोजगी यांनी सदर जमिनी संदर्भातील 1961 पासूनची कागदपत्रे तपासली जातील.
त्याचप्रमाणे त्यानंतर त्यामध्ये काय काय बदल झाले आहेत? हे पाहिले जाईल. या पद्धतीच्या वादग्रस्त जमिनीच्या बाबतीत एक प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांकडे धाडावा लागतो. त्यानंतर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कागदपत्रानुसार आहेत की नाहीत? याची शहानिशा केली जाईल. या प्रक्रियेदरम्यान कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट करून आपले खाते कशाप्रकारे चौकशी करून न्याय देते याची माहिती तहसीलदार सिद्राय भोजगी यांनी दिली.
तुमच्या जमिनीचा व्यवहार उपयोग नोंदणी कार्यालयात नोंद झाला आहे का? ते तपासावे लागेल. झऱ्याच्या पाण्याच्या बाबतीत आम्ही कार्यवाही करू शकतो तथापि जमिनीच्या व्यवहारांची उपनोंदणी कार्यालयात नोंद झाली असेल तर त्याबाबतीत कार्यवाही करण्याचा अधिकार तहसीलदारांना देखील नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी व गावकऱ्यांनी सदर जमिनीमध्ये खादरवाडी रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणारा बक्काप्पा देवाचा पाण्याचा झरा आहे. खादरवाडीवासीय गेली 100 वर्षे या झऱ्याचे पाणी पित आहेत.
त्यामुळे जर ही जमीन पूर्वत कब्जेदार शेतकऱ्यांच्या नावाने झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. याप्रसंगी खादरवाडी गावातील समस्त गावकरी, शेतकरी संघटना, श्रीराम सेना हिंदुस्तान पदाधिकारी कार्यकर्ते आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.