बेळगाव लाईव्ह : आरोग्य खात्याच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना रुग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचारांवरील खर्चासंदर्भात महत्वपूर्ण सूचना केल्या असून रुग्णालयात होणाऱ्या विविध उपचारांचे दर बाहेर सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
दिवसेंदिवस रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करावी. याबाबतचा अहवाल २० मार्चपर्यंत सरकारला पाठवावा. दर प्रसिद्ध न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचे संकेत आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे.
राज्य शासनाने सर्व रुग्णालयांना या नियमाचे सक्तीने पालन करण्याची ताकीद दिली असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करून त्याचा अहवाल २० मार्चपर्यंत देण्याची सूचना करण्यात आली आहे.
आरोग्य खात्याच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना याबाबत परिपत्रक पाठवले आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराचे शुल्क म्हणून रुग्णांची लूट केली जात आहे.
याबाबत असंख्य तक्रारी आरोग्य खात्याकडे करण्यात आल्या आहेत. याची गांभीयनि दखल घेताना राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना उपचाराचे दर घोषित करण्याचे सुनावले आहे.