बेळगाव लाईव्ह:मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील श्री विठ्ठल रखुमाई, श्री कलमेश्वर आणि श्री मारुती ही तीनही मंदिरं एकत्रित एका जागी होणार असल्यानिमित्त आयोजित भव्य हळदी-कुंकू समारंभ नुकताच उस्फुर्त प्रतिसादात उत्साहाने पार पडला.
मंडोळी येथील सदर हळदी-कुंकू समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, माजी महापौर सरिता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेत्री अलका कुबल यांनी आजच्या काळात महिलांनी सक्षम झाले पाहिजे असे सांगून सासू सुनेच्या नात्याबद्दल मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
सासु आणि सुनेमध्ये आई -मुली सारखे नाते असले पाहिजे असे सांगून यावेळी त्यांनी ‘माहेरची साडी’ या आपला गाजलेल्या चित्रपटातील एका गीताच्या कांही ओळी गाऊन उपस्थित महिलांची मने जिंकली.
माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी समायोचित विचार व्यक्त करताना आई ही शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊं सारखी असावी आणि पुत्र असावा तर शिवबां सारखा असावा. शिवरायांनी जसं स्वराज्य घडवलं तसं आपण आपल्या संसारात कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घेत आपल्या मुलांना घडवलं पाहिजे.
तसेच प्रत्येक गावात मंदिर होत आहेत. मात्र त्यामध्ये शिवरायांचे एकही मंदिर नाही. आज चौकाचौकात शिवबा मूर्तीच्या स्वरूपात थंडी-ऊन-पाऊस झेलत उघड्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांचे मंदिर झालं पाहिजे असे सांगून मंदिर म्हणजे शांती, समाधानाचा एक उत्तम मार्ग आहे. त्या ठिकाणी मनातील वाईट विचार निघून जातात आणि समोरील माणूस देवा समान भासतो, असे त्या म्हणाल्या.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी महिलांच्या आरोग्याच्या तंदुरुस्ती संदर्भात मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. माजी महापौर सरिता पाटील यांनी देखील समायोचित विचार व्यक्त केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या भाषणानंतर हळदीकुंकू समारंभ खेळीमेळीत मोठ्या उत्साहाने पार पडला. समारंभास मंडोळीसह पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.