बेळगाव लाईव्ह:भू-संपादन आणि नुकसानभरपाईच्या मुद्द्यांबाबत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे बेळगाव-धारवाड रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे असे सांगून जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आजच्या केडीपी आढावा बैठकीत या आंदोलनांमुळे प्रभावित झालेल्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी योग्य तो उपाय शोधण्याच्या गरजेवर भर दिला.
केडीपी अर्थात कर्नाटक विकास कार्यक्रम आढावा बैठक आज शुक्रवारी सकाळी पार पडली. बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या प्रगतीचा टप्पा लक्षात घेऊन पुढे जाण्याच्या निकडीवर भर दिला. तथापि शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विशेषतः तेगूर ते देसूर या रेल्वे मार्गाच्या बांधकामाबाबत आव्हाने निर्माण झाली आहेत. देसूर आणि करविनकोप्प दरम्यानच्या सुमारे 150 एकर सुपीक जमीन उध्वस्त होणार असल्यामुळे शेतकरी मार्ग बदलण्याची विनंती करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
त्यावर बोलताना चर्चेद्वारे आणि वाढीव भरपाईच्या प्रस्तावांद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, कांही अडथळ्यांमुळे त्वरित निराकरण होण्यास अडचण येत आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या, 608 भूखंडांपैकी 444 भूखंडांवर काम सुरू असून सध्या आवश्यक जमिनीपैकी केवळ कांही भागच संपादित करण्यात आला आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रिया जलद करण्याची गरज अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली. बैठकीस खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार असिफ (राजू) सेठ, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, विधान परिषद सदस्य एम. नागराज आदींसह विविध खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.