बेळगाव लाईव्ह: आगामी एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ शेठ यांनी सरकारी जागेतील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी खंजर गल्लीतील जुन्या विहिरीची स्वच्छता साफसफाई चे काम सुरू झाल्यानंतर शनिवारी लगेच छ्त्रपती शिवाजीनगर येथील जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन कामची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या माध्यमातून या कामाची सुरुवात झाली आहे.
उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर 3 री गल्ली येथील महिला बाल कल्याण खात्याच्या कार्यालय आवारातील बुजावलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला.सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ आणि गल्लीतील वडीलधारी पंचमंडळी उपस्थित होती.
यावेळी विहिरीच्या पुनरुज्जीवन कामाचे भूमिपूजन पंचमंडळींच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे आमदार सेठ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठीचा निधी आमदार राजू सेठ यांनी आपल्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्यासाठी प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. अलीकडच्या काळात काळात छ. शिवाजीनगर परिसरातील लोकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदर समस्येचे निवारण करण्यासाठी महिला बाल कल्याण खात्याच्या कार्यालय आवारातील विहिरीचे पुनरुज्जीवन केले जात आहे.
आज सकाळी भूमीपूजन समारंभ स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना आमदार असिफ (राजू) सेठ म्हणाले की, सदर विहिरीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पाईपलाईनद्वारे छ. शिवाजीनगर, पंजीबाबा या परिसराला पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. अलीकडच्या काळात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. हे लक्षात घेऊन माझे मोठे बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांनी खंजर गल्ली, हुतात्मा चौक वगैरे ठिकाणच्या पूर्वीच्या विहिरींचे पुनरुज्जीवन केले आहे. आम्ही देखील शहरातील दुर्लक्षित किंवा बुजवण्यात आलेल्या जुन्या विहिरी शोधून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहोत. छ. शिवाजीनगर येथील या विहिरीसाठी विहिरीसाठी सात लाखाचे टेंडर आहे तसेच येत्या 15 दिवसात विहिरीच्या पुनर्जीवनाचे काम पूर्ण होईल असे सांगून सदर विहीर पूर्ववत क्रियाशील झाल्यास या भागातील जनतेला पाण्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे, असे आमदार सेठ यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक शिवाजी मंडोळकर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाली की, असिफ सेठ साहेब आमदारपदी निवडून आल्यापासून छ. शिवाजीनगर येथील पाणी टंचाईसंदर्भात मी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याची दखल घेत आमदारांच्या पुढाकाराने महिनाभरातच म्हणजे जवळपास 6 महिन्यांपूर्वी सदर विहिरीच्या विकास कामाचे टेंडर पास करण्यात आले होते. कांही कारणास्तव त्या टेंडरची पूर्तता झाली नव्हती, ती आता होत असून विहीर पुनरुज्जीवनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याबद्दल आम्ही आमदारांचे आभारी आहोत. सदर विहीर ही शहरातील सर्वात जुन्या विहिरींपैकी एक आहे. या विहिरीला संपूर्ण छ. शिवाजीनगर व पंजी बाबा परिसराला पुरेल इतके मुबलक पाणी आहे. विहिरीच्या कामासह आमदार सेठ यांच्या पाठिंबामुळे माझ्या प्रभागात अन्य विकास कामे देखील सुरू आहेत. त्याचप्रमाणे शहरातील वापरात नसलेल्या जुन्या विहिरी दाखवा त्यांचे आपण पुनरुज्जीवन करून आणि विहिरीवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करूया, असे आमदारांनी आम्हाला सांगितले आहे.
तसे झाल्यास सर्वत्र पाणी उपलब्ध होणार असून शहरातील पाणीटंचाईची समस्या कायमची निकालात निघणार आहे. तेंव्हा सर्वांनी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच जिथे जुन्या विहिरी आहेत. त्या आमदार सेठ यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन नगरसेवक मंडोळकर यांनी केले याप्रसंगी आजच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी छ. शिवाजीनगर व पंजी बाबा येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.