बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून यामुळे या भागातील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी बेळगावच्या महापौरांकडे आज निवेदन सादर केले.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी यापूर्वीही मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून आज पुन्हा महापौरांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन करण्यात आले.
या भागात उद्भवलेल्या ड्रेनेज वाहिनीच्या समस्येबाबत केलेल्या मागणीचा पाठपुरावा करत ड्रेनेज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. याबद्दल महापौरांचा सत्कारही करण्यात आला होता. मात्र अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसून यामुळे विविध समस्यांना स्थानिक रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता सुस्थितीत नसल्याने गांधी स्मारकापर्यंत बससेवा पोहोचत नाही.
यामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पायपीट करत पहिल्या बसस्थानकापर्यंत यावे लागत आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा फटका रस्त्याशेजारील दुकाने आणि रहिवाशांना बसत आहे. या भागातून येणाऱ्या विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, जेणेकरून बससेवा सुरळीत होईल, आणि योग्य रस्त्यामुळे वाहनधार आणि पादचाऱ्यांनाही सोयीचे होईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.