बेळगाव लाईव्ह : लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या पण कॅन्सरला कारण ठरणाऱ्या बॉम्बे मिठाईवर अखेर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी आज राज्यात रंगीत कॉटन कँडीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
विकाससौध येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, कलर कॉटन कँडीमध्ये (बॉम्बे मिठाई) अनेक विषारी घटक असतात आणि त्याची विक्री किंवा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006 नियम 59 चे उल्लंघन केल्याचे प्रकरण आढळल्यास 7 वर्षापासून जन्मठेप आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होण्यासाठी संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल केला जाईल.
कृत्रिमरीत्या बनवेल्या कलर कॉटन कँडी तसेच गोबी मंचुरीसारख्या खाद्यपदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने लहान मुलांसह ग्राहकांना कर्करोगासारख्या घातक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यामुळे, जनतेला कृत्रिम रंगांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गोबी मंचुरियनसारखे पदार्थ बनवताना कृत्रिम रंग वापरल्यास कारवाई करण्यात येणार आहे.