बेळगाव लाईव्ह : मनपाने २०२४-२५ या वर्षाचा अंदाजित अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पात हेस्कॉमकडून भूमिगत वीजवाहिन्यांसाठी १७ कोटी रुपयांचे भुभाडे आकारले जाण्याची अपेक्षा मांडली आहे.
हेस्कॉमने शहरांतर्गत हाय टेंशन (एचटी) आणि लो टेंशन (एलटी) लाईन्सच्या भूमिगत वीजवाहिन्या जोडणीसाठी सात वर्षांपूर्वी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी मनपाने हेस्कॉमकडून १७ कोटी रुपयांचे भू भाडे वसूल होईल, अशी अपेक्षा मनपाने अर्थसंकल्पात मांडली आहे. मात्र वारंवार विनंती करूनही, या रकमेबाबत बेळगाव महानगरपालिका अद्याप हेस्कॉम कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
ठिकठिकाणी लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. विशेषतः पावसाळ्यात हि समस्या अधिक जाणवते. शहरातील विविध ठिकाणी उद्भवणाऱ्या या समस्येवर तोडगा म्हणून भूमिगत वीजवाहिन्या जोडण्याचे काम २३९.३ कोटी रुपये खर्चून हेस्कॉमने २०१५ ते २०१७ या कालावधीत हाती घेतले होते.
या प्रकल्पांतर्गत ज्या ज्या ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत त्या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत. या जमिनीसाठी मनपाने भुभाडे आकारले असून सदर भाड्याची रक्कम भरण्याची विनंती मनपाने हेस्कॉमला केली आहे. शिवाय मनपाने हेस्कॉमला २०१८ पासून दरवर्षी भुभाडे भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.
बेळगाव शहरात सुमारे ९८० किलोमीटर रस्ता खोदण्यात आला असून वारंवार नोटिसा आणि कायदेशीर कारवाईचे इशारे देऊनही, हेस्कॉमने आजपर्यंत भुभाड्याची रक्कम भरली नाही. हा प्रकल्प राबविण्यासाठी कर्ज घेण्यात आले असून बेळगावच्या लोकांच्या हितासाठी हा प्रकल्प राबवण्यात आल्याचे हेस्कॉम अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.