बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य तसेच आंतरजिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय मंगळवारी कोल्हापूर येथे झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर येथील रेसीडन्सी क्लब येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतल्यानंतर सीमाभागातील तपासणी चौक्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाला दिल्या आहेत.
कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील व लगतच्या इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली.