बेळगाव लाईव्ह विशेष : परीक्षा हा शिक्षण व्यवस्थेचा अपरिहार्य भाग आहे. विद्यार्थ्यांची समज आणि क्षमता मोजण्यासाठी साधन म्हणून काम केल्या जाणाऱ्या या परीक्षेचा ताण जितका विद्यार्थ्यांना असतो तितकाच तो पालकांनाही असतो. परीक्षा सुरळीत पार पडेपर्यंत याचा भार शिक्षक, शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागवरही असतो. मात्र सध्या कर्नाटकात सुरु असलेल्या इयत्ता पाचवी, आठवी आणि नववीच्या परीक्षेचा लपंडाव विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनाही डोईजड ठरतो आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या तयार करण्यासाठी, शिक्षणातील महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे या उद्देशाने इयत्ता पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेण्याचे कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने ठरविले होते. या निर्णयाला शाळा संघटनानी विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी आजवर तीनवेळा निर्णय बदलण्यात आले. परीक्षेच्या बाबत कर्नाटकात सुरु असलेला खेळखंडोबा पाहता विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची होणारी दमछाक त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाची उडणारी त्रेधातिरपीट पाहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित बाजूला सारले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
कर्नाटकात सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय भाषा विषयांचे पेपर झाले आहेत. दरम्यान, परीक्षेसंबंधी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिल्याने १३ मार्चपासून होणारे पेपर पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहेत. बोर्ड परीक्षेच्या लपंडावामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परीक्षेवरील स्थगिती उठविण्यात आल्याने परीक्षेला नियोजित वेळापत्रकानुसार प्रारंभ झाला. आता परीक्षा सुरू असतानाच त्या लांबणीवर टाकण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षाही अधिक ताण हा नेहमीच परीक्षेचा असतो. परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, अव्वल दर्जाचा निकाल लागावा यासाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचा वेग वाढतो. आणि यादरम्यान विद्यार्थी वेगळ्याच मानसिकतेत आढळून येतात. चांगल्या निकालाच्या दबावामुळे, विद्यार्थ्यांना अनेकदा परीक्षेचा ताण येतो, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हल्ली मुलाच्या आकलन क्षमतेपेक्षाही गुणपत्रिकेवरील गुणांवरून विद्यार्थ्यांचा कस ठरविला जातो. यामुळे पालकदेखील मुलांकडून उच्च दर्जाच्या अपेक्षा बाळगतात. यातूनच मुलांना अधिक अभ्यासाच्या दबावाखाली आणि दडपणाखाली परीक्षा काळात राहावे लागते. दुसरीकडे वेळोवेळी सतत परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करणे या गोष्टींचा समावेश करत नवनवीन शिक्षण पद्धतींचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर अधिक ताण वाढू लागला आहे.
बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर झालेल्या परिणामांबाबत आजवर अनेक सर्वेक्षण पार पडली आहेत. भविष्याची अनिश्चितता, परीक्षेची काळजी, परीक्षेतील गुणांची काळजी यासोबतच अपेक्षांचे ओझं टाकण्याची जुनी परंपरा या सर्व कारणांमुळे विद्यार्थी दशेतील मुलांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. ज्या कुटुंबातील मुले बोर्ड परीक्षा देतात त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंबावरच परीक्षेचा ताण असतो. पालकांच्या वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे अलीकडे विद्यार्थीवर्गातून शिक्षणाबद्दल आसक्ती दिसण्या ऐवजी शिक्षणाची सक्तीच अधिक दिसून येत आहे. याशिवाय हल्लीच्या मुलांचा वाढलेला मोबाईल, टीव्ही आणि सोशल माध्यमांचा वापरही विद्यार्थ्यांसाठी मारक ठरत आहे.
केवळ परीक्षांचे आणि अभ्यासाचे ओझे घेऊन चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इतर महत्वाचे पैलू बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे बाजूला हटत असून दमछाक करणारी शिक्षण पद्धती आणि कर्नाटकात सुरु असलेल्या परीक्षेससंदर्भातील गोंधळाची परिस्थिती यामुळे विद्यार्थी आणखीनच संभ्रमात पडत आहेत. कोरोनानंतर काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे फटका बसला तर काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलचे वेड लागले. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण अधिक न वाढवता योग्य आणि सुरळीत नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढेल, आणि शिक्षण पद्धतीचा विद्यार्थी दशेव्यतिरीक्त पुढील आयुष्यात उपयोग होईल, या अनुषंगाने निर्णय घेणे अपेक्षित आहे.