बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या बुधवारी आयोजित जंगी निकाली कुस्त्यांच्या मैदान हे आतापर्यंतचे उजवे मैदान असणार असून या मैदानातील पै. सिकंदर शेख आणि पै. गुरुजीत सिंग यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती ही समस्त कुस्ती शौकिनांसाठी एक पर्वणीच असणार आहे, अशी माहिती संयोजक प्रमुख सुधीर बिर्जे यांनी बेळगाव लाईव्हला दिली
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या बुधवारी आनंदवाडी आखाड्यात निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. सध्या सदर मैदानाच्या आयोजनाची पूर्वतयारी सुरू असून बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने आज सोमवारी आनंदवाडी आखाडा येथे संयोजक प्रमुखांपैकी एक असलेल्या सुधीर बिर्जे आणि जोतिबा हुंदरे यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी सुधीर बिर्जे म्हणाले की, या आनंदवाडीच्या आखाड्यात यंदा यापूर्वी मॅटवरील कुस्त्यांचे एक मैदान आणि मातीतील कुस्त्यांची दोन मैदाने झाली असली तरी या सर्वांपेक्षा येत्या बुधवारी होणारे कुस्ती मैदान उजवे ठरणारे असणार आहे. कारण सध्याचा महाराष्ट्र केसरी आणि देशातील नंबर एकचा पैलवान सिकंदर शेख याला आम्ही निमंत्रित केले आहे त्याच्याविरुद्ध मातब्बर पै. जस्सा पट्टेरी विरुद्ध लढलेला पंजाबचा पैलवान गुरुजीत सिंग झुंज देणार आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सध्याचा स्टार पैलवान माऊली कोकाटे हा या मैदानात हजेरी लावणार असून त्याच्या विरुद्ध लढत देण्यासाठी इराणच्या दोन पैलवानांना निमंत्रित करण्यात आले आहे याखेरीज कर्नाटकचा वाघ कार्तिक काटे याची कुस्ती या मैदानात होणार होणार आहे. युट्युब वर गाजत असलेला पैलवान देवा थापा याला आम्ही कर्नाटकात सर्वप्रथम बेळगावमध्ये कुस्ती मैदानात उतरवत आहोत असे सांगून याव्यतिरिक्त बेळगाव शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील होतकरू मल्लांच्या सुमारे 90 काटाजोड कुस्त्या या कुस्ती मैदानात आम्ही ठेवल्या आहेत, अशी माहिती बिर्जे यांनी दिली.
बुधवारी होणाऱ्या कुस्ती मैदानाचा उद्देश स्पष्ट करताना कुस्तीगीर संघटनेचे सेक्रेटरी जोतिबा हुंदरे म्हणाले की, सध्या बेळगाव शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागात अनेक उदयोन्मुख होतकरू पैलवान आहेत. या पैलवानांना कुस्तीमध्ये नाव कमावण्यासाठी वा मिळावा त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून आम्ही हे कुस्ती मैदान आयोजित करत आहोत.
या खेरीज या पद्धतीने कुस्ती मैदानांचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील बंद पडलेल्या कुस्त्यांच्या तालमींना पुन्हा उर्जित अवस्था यावी आणि या तालमींमध्ये मातब्बर पैलवान तयार होऊन त्यांनी बेळगावचा नावलौकिक राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवावा हा देखील सदर कुस्ती मैदान आयोजनाचा उद्देश आहे. गेली 40 दिवस आम्ही हे कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पडावे यासाठी झोकून देऊन काम करत आहोत.
कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाचा मल्ल पैलवान सिकंदर शेख आणि दुसरे आकर्षण असलेला पैलवान देवा थापा यांच्या संदर्भात बोलताना सुधीर बिर्जे म्हणाले की, पै. सिकंदर शेख यांचे संपूर्ण भारतात लाखो चाहते आहेत. कारण त्याने आपल्या जबरदस्त मल्ल कौशल्याचा जोरावर देशातील मातीच्या कुस्ती मैदानात अक्षरशः धुमाकूळ घालून ती गाजवली आहेत. त्यामुळे त्याची कुस्ती पाहणे ही बेळगावच्या कुस्ती शौकिनांसाठी एक पर्वणीच असणार आहे. त्याचप्रमाणे युट्युब वर मनोरंजनात्मक कुस्तीचा हिरो अशी ज्याची ओळख आहे तो पै. देवा थापा प्रथमच बेळगावातील आमच्या कुस्ती मैदानात हजेरी लावत आहे अशी माहिती देऊन शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने आपल्या पारंपारिक कुस्ती खेळाचे महत्व लक्षात घेऊन आजची युवा पिढी या खेळाकडे आकर्षित व्हावी या उद्देशाने आम्ही हे कुस्ती मैदान भरवले आहे, असे सुधीर बिर्जे यांनी शेवटी स्पष्ट केले.
येत्या बुधवारी होणारे कुस्ती मैदान हे आनंदवाडी आखाड्यातील यावर्षीचे तिसरे मैदान आहे. थोडक्यात आधुनिक मॅटवरील कुस्त्यांच्या युगात बेळगावमध्ये पारंपारिक मातीतील कुस्तीला पुनश्च चालना मिळू लागल्यामुळे कुस्तीतील जुनी जाणकार मंडळी आणि कुस्ती शौकिनांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.