बेळगाव लाईव्ह :गेल्या कांही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून आज किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस असणाऱ्या बेळगाव शहराचा पारा वाढवून तब्बल 37.7 अंश सेल्सिअस इतका झाला होता.
यंदा मार्चपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. गेल्या कांही दिवसांपासून तर शहरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.
त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून नागरिकांकडून दिवसभर पंखा आणि वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढला आहे. कांही दिवसांपासून दुपारच्या वेळेत पारा 35 अंशापर्यंत जात आहे.
आज सोमवारी तर तो 37.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. कडक उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी ओसरू लागली असून दुपारी 12 ते 4 या वेळेत रस्त्यांवर नागरिकांचा तुरळक वावर दिसत आहे.
उष्मा वाढल्याने सध्या कोल्ड्रिंक हाऊस चालक, रस्त्याशेजारी गाडीवर शीतपेय, आईस्क्रीम, कुल्फी वगैरेंची विक्री करणारे किरकोळ विक्रेते, शहाळी विक्रेते वगैरेंचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.