Saturday, January 18, 2025

/

बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचा पायाभरणी दिमाखात

 belgaum

बेळगाव लाईव्ह:भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने (एएआय) बेळगाव विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी बोलताना देशव्यापी प्रगतीसाठी सरकारच्या समर्पणावर भर देत पंतप्रधानांनी काल रविवारी 10 मार्च रोजी विमानतळ सुधारणांपासून पायाभूत सुविधांच्या सुधारणांपर्यंतच्या केंद्राच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.

देशभरातील सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या विकासात्मक प्रकल्पांसह सरकारचे प्रयत्न घोषणांच्या पलीकडचे आहेत असे सांगून पंतप्रधान मोदींनी सर्वसमावेशक विकासासाठी सक्षम वातावरण तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यामध्ये रेल्वे स्थानके, रेल्वे मार्गांचे बांधकाम आणि नवीन शैक्षणिक धोरण आणि किसान सन्मान योजना यासारख्या महत्त्वाच्या धोरणांची अंमलबजावणी यांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले.

या पायाभरणी सोहळ्याचे महत्त्व सांगताना, पंतप्रधान मोदी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बेळगावसारख्या छोट्या शहरांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. ऊस पिकापासून इथेनॉल आणि बायोगॅसचे उत्पादन करणाऱ्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा दाखला देत त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि कृषी उत्पादकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांवर भर दिला.

टर्मिनल इमारतीचा कालचा पायाभरणी समारंभ बेळगाव विमानतळासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. जो नवीन टर्मिनलच्या बांधकामासह परिवर्तनाचा साक्षीदार बनणार आहे. पंतप्रधान मोदींनी काल रविवारी देशभरातील अन्य 15 विमानतळांच्या ठिकाणी असलेल्या अशाच प्रकारच्या प्रकल्पांचा काल एकाच वेळी पायाभरणी करून उद्घाटन केले. तसेच या माध्यमातून देशव्यापी हवाई दळणवळण (कनेक्टिव्हिटी) वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे दर्शन घडविले.

यावेळी बोलताना स्थानिक नेते राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी बेळगावचे ऐतिहासिक महत्त्व आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. इस्रो, चांद्रयान आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रातील बेळगाव जिल्ह्याच्या योगदानावर त्यांनी भर दिला आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, बेंगलोरच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मॉडेलवर बेळगाव विमानतळाचे एक विशेष डिझाइन तयार करण्यात आले आहे. या विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीसह लिफ्ट, विस्तारित पार्किंग आणि विमानांसाठी आवश्यक विस्तारित रनवे पार्किंग वगैरे विविध सुधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.Airport

सदर सुमारे 230 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी आधीच निविदा जारी केल्या आहेत. बेळगाव विमानतळामध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या मानकांनुसार बदल घडवून आणले जातील. केएमव्ही प्रोजेक्ट्सने बेळगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीच्या नागरी बांधकामाचे 220 कोटींचे कंत्राट मिळवले आहे. नियोजित नव्या टर्मिनल इमारतीमध्ये 4 एरोब्रिज असतील, ज्यामुळे विमानतळावरील गर्दीच्या वेळेत (1,200 आगमन आणि 1,200 निर्गमन) तब्बल 2,400 प्रवाशांची ये-जा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नवी टर्मिनल इमारत कार्यान्वित झाल्यानंतर सध्याचे टर्मिनल आगमन व्यवस्थापित करण्यासाठी वापरण्यात येईल. एएआयचे सल्लागार, लँड्रम आणि ब्राउन यांनी असा अंदाज वर्तवतात की या विस्तारामुळे विमानतळाला 2037 पर्यंत दरवर्षी 2.0 दशलक्ष प्रवाशांच्या रहदारीची मागणी (एमपिपीए) पूर्ण करणे शक्य होईल, अशी माहिती कडाडी यांनी दिली.

बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी बेळगावी विमानतळावरील पायाभूत सुविधा वाढविणाऱ्या योजनांवर भर दिला. तसेच विमानतळावरील धावपट्टीची सुधारणा आणि विमान फेऱ्या वाढण्याच्या दृष्टीने पुरेशा पार्किंग सुविधांच्या तरतूदीसह आगामी उपक्रमांवर प्रकाश टाकला. याखेरीज बेळगाव विमानतळाला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याच्या दिशेने परिश्रमपूर्वक काम करण्याची वचनबद्धता खासदार अंगडी यांनी व्यक्त केली.

खासदारांना दुजोरा देताना राज्यसभा सदस्य ​​कडाडी यांनी या प्रदेशाचे ऐतिहासिक महत्त्व, समृद्ध वारसा आणि भारतीय इतिहासातील योगदान अधोरेखित करणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा या ऐतिहासिक व्यक्तीचा सन्मान करणारा पुतळा बेळगाव विमानतळासमोर बसवण्याचा प्रस्ताव यावेळी केंद्र सरकारकडे मांडला. पायाभरणी कार्यक्रमास स्थानिक आमदार, सरकारी प्रतिनिधी आणि विमानतळ अधिकाऱ्यांसह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.