बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपले प्राबल्य कायम राखले असून महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उपमहापौरपदी आनंद चव्हाण निवडून आले आहेत.
बेळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज मोठ्या उत्सुकतेत आणि शांततेत पार पडली. महापौर पदाच्या आरक्षणासाठी महापालिकेतील सर्व नगरसेवकांपैकी केवळ भाजपच्या सविता कांबळे आणि लक्ष्मी राठोड या दोनच नगरसेविका पात्र होत्या. मात्र, यापैकी राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी एकूण चौघेजण रिंगणात होते. मात्र, यामध्ये भाजपचे नगरसेवक आनंद चव्हाण यांनी सरशी मारली. त्यांना एकूण 39 मते पडली.
निवडणूक वेळापत्रकानुसार आज गुरुवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर दुपारी 1 वाजता प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. आजच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वच लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी सहभाग दर्शवला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अतिशय रंजकरित्या सुरू होती.
भारतीय जनता पक्षाचे बहुमत असलेल्या बेळगाव महापालिकेमध्ये यापूर्वी महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचेच उमेदवार होते. मात्र, आता महापौरपदासाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण मिळाल्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नगरसेविका लक्ष्मी राठोड व सविता कांबळे या दोन्ही उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उपमहापौरपद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आल्याने या पदासाठी एकूण 4 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये नगरसेवक आनंद चव्हाण, माधवी राघोचे, शहामुबीन पठाण व ज्योती कडोलकर यांचा समावेश होता. यावेळी अर्जांची पडताळणी होण्याबरोबरच सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत महापौर पदासाठी इच्छुक नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
महापालिकेत सत्ताधारी भाजपचे संख्याबळ 39 इतके असले तरी दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंबामुळे त्यांचे संख्याबळ 41 पर्यंत पोहोचले. परिणामी महापौर व उपमहापौर पदासाठी 33 हा जादुई आकडा होता. तथापी नगरसेविका राठोड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महापौर पदाच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवला नाही. उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मात्र नगरसेवक आनंद चव्हाण, माधवी राघोचे, शहामुबीन पठाण व ज्योती कडोलकर यांच्यात स्पर्धा होती. मात्र मतदानामध्ये नगरसेवक आनंद चव्हाण यांना जादुई आकडा पार करत सर्वाधिक 39 मते पडली. त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी नगरसेविका ज्योती कडोलकर यांना 20 मतांवर समाधान मानावे लागले.
निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर यांनी निकाल जाहीर करत महापौरपदी भाजपच्या सविता कांबळे यांची बिनविरोध तर उपमहापौर पदी आनंद चव्हाण यांची 39 मतांनी निवड झाल्याचे घोषित केले. निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे भाजपचे माजी मंत्री मुरुगेश निरणी माजी खासदार मंगला अंगडी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी नूतन महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.