बेळगाव लाईव्ह :कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी (यल्लमा) मंदिर येथे लवकरच तिरुपती आणि शिर्डीच्या धर्तीवर भक्तांना प्रसादासाठी लाडू उपलब्ध करून दिला जाणार आहे.
श्री रेणुकादेवी मंदिर प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली असून लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्याप्रमाणे तिरुपती व शिर्डी येथे प्रसादाच्या लाडूचे वितरण केले जाते.
त्याचप्रमाणे श्री रेणुकादेवी मंदिर परिसरात लाडू उपलब्ध करून दिले जावेत अशी मागणी केली अनेक वर्षे भाविकांकडून होत होती. त्याची दखल घेत मंदिर प्रशासनाने वर्षभर लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.
लाडू उपलब्ध करून देण्यासाठीच्या ज्या स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या पुढे येतील त्यामधून एकाची निवड केली जाणार आहे. येत्या महिन्याभरात श्री रेणुका देवीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद मागून लाडू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लाडू उपलब्ध करून देण्यासाठी विशेष काउंटर सुरू केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडू वितरणाबाबतचे अधिक माहिती दिली जाईल, असे मंदिर प्रशासनाचे एसबीपी महेश यांनी स्पष्ट केले आहे.