बेळगाव लाईव्ह : शासकीय सुविधांच्या लाभासाठी रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची मोठी निराशा झाली आहे. नवीन रेशनकार्डच्या कामासाठी प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.
मार्चपासून नवीन रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डसाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
येत्या काळात लोकसभेची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा रेशनकार्डच्या कामाला स्थगिती मिळविण्याची शक्यता आहे. सरकारने मार्चपासून रेशनकार्डच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र मार्च अखेरपासूनच निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे रेशनकार्डचे काम मार्चमध्ये सुरू होणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गॅरंटी योजनांची अंमलबजावणी झाल्यानंतर रेशनकार्डच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. रेशनकार्डसाठी नवीन अर्ज स्वीकृतीची प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. अनेकांच्या रेशनकार्ड दुरुस्तीचे कामही थांबले आहे. मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अनेकांना रेशनकार्डविना बसावे लागले आहे.
विशेषत: शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. मध्यंतरी काही काळ रेशनकार्डचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर रेशनकार्डचे काम पूर्णपणे थांबले आहे.
नवीन रेशनकार्डच्या प्रतीक्षेत हजारो लाभार्थी आहेत. त्याबरोबर अर्ज करण्यासाठीही हजारो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रेशनकार्डचे काम कधी सुरू होणार, याचीच चिंता लागली आहे.