बेळगाव लाईव्ह:बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानक ज्याला क्वचित प्रसंगी ‘गोवा बस स्टॅन्ड’ देखील म्हंटले जाते. या बस स्थानकाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास करण्यात आला असला तरी विकासाची ती चिन्हे आता लोप पावत आहेत. सध्या या बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकावरील आसन व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले येथील 12 दुकानांचे गाळे धुळखात रिक्त पडले असून जे समाजकंटकांसाठी एकत्र जमण्याचे स्थळ बनले आहे. रेल्वे स्थानकासमोर प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेले हे बस स्थानक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येते. बस स्थानकाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2 कोटी रुपये खर्च करून विकास साधण्यात आला आहे. सदर बस स्थानकावर परिवहन मंडळाच्या सरकारी बसेस साठी 7 फलाट आहेत तर खाजगी बसेससाठी 5 फलाट आहेत. तथापि एकेकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या बस गाड्यांची संख्या कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आकारल्या जाणाऱ्या पार्किंग शुल्काच्या वादावरून घटली आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर म्हणाले की, आधुनिक पायाभूत सुविधेचे प्रतीक असूनही दुर्लक्षामुळे रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकाची दुर्दशा झाली आहे. बस स्थानक देखभालीच्या आपल्या जबाबदारीकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. दुकाने, पोलीस पोस्ट, महिलांसाठीचे प्रतीक्षागृह यासारख्या या ठिकाणच्या विविध सुविधा बंद अवस्थेत आहेत. बस स्थानकावरील बहुतांश आसनांची अवस्था दयनीय झाली आहे. ही परिस्थिती पायाभूत विकासाचे गंभीर पैलू अधोरेखित करते. तसेच देखभाल प्रणालीच्या पुनरुज्जीवनाची गरज व्यक्त करते. फक्त इमारतींची संरचना करण्यात अर्थ नाही तर प्रश्न समुदायासाठी त्यांची दीर्घायु आणि कार्यक्षमता हे सुनिश्चित करण्याबद्दलचा आहे. सदर बस स्थानकावरील प्रत्येकी 67 चौ. फुटाचे दुकानांचे गाळे सध्या समाजकंटकांसाठी अवैध – अनैतिक क्रियाकलाप करण्याच्या जागा बनल्या आहेत. या ठिकाणी इतस्ततः पडलेले कपडे येथे घडणाऱ्या अनैतिक प्रकारांकडे बोट दाखवतात. या खेरीज बस स्थानक आवारात दारूचे टेट्रा पॅक, दारू -बियरच्या बाटल्या पडलेल्या आढळून येतात.
कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी जादा रहदारी नसल्यामुळे मासिक 20 हजार रुपये भाडे भरून या ठिकाणची दुकाने चालविण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नाही. तथापी भाड्याची रक्कम एक चतुर्थांश इतकी कमी करून निविदा काढण्यात आली आहे. दुसरीकडे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बस स्थानकावर गोवा राज्याच्या फक्त 8 बसेस आणि वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या (एनडब्ल्यूकेआरटीसी) 8 बसेस येतात. या संदर्भात एनडब्ल्यूकेआरटीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड म्हणाले की, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी हे बस स्थानक उभारण्यात आले आहे. तथापी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून बसेससाठी ज्यादा पार्किंग शुल्क आकारले जात आहे. या पद्धतीने वाहतूकदारांना बस स्थानकावर पार्किंगसाठी ज्यादा शुल्क भरावे लागणे अयोग्य आहे. जर येथील बसेसची संख्या वाढली तर आपोआप दुकानेही सुरू होऊन चांगला व्यवसाय करतील. ज्यामुळे या ठिकाणचे संपूर्ण वातावरण बदलेल.
आमदार असिफ (राजू) सेठ यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी आणि परिवहन एजन्सी अधिकाऱ्यांची बैठक येत्या शनिवारी आयोजित केली असल्याचे सांगितले. या बैठकीत बस पार्किंग शुल्काच्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बस स्थानकाच्या देखभालीची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची आहे. येथील दुकानांच्या लिलावासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. लवकरच दुकानांची समस्याही निकालात काढली जाईल असे आमदार सेठ म्हणाले.