बेळगाव लाईव्ह : सध्या उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रांगेत उभे राहिलेले असतात. गर्दीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे.
हा वेळ वाचविण्यासाठी तसेच नागरिकांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आपणास अनुकूल ठरणाऱ्या उपनोंदणी कार्यालयात मालमत्तांशी संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
सर्वसामान्यांची मालमत्तांशी संबंधित नोंदणी त्या-त्या जिल्ह्यातील उपनोंदणी कार्यालयात करण्यात येत आहे. प्रारंभी, बेळगाव आणि तुमकुर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात प्रायोगिकरित्या ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
त्यानंतर संपूर्ण राज्यभरात या प्रक्रियेची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या राजधानी बंगळूर येथे असणाऱ्या पाच उपनोंदणी जिल्हा कार्यक्षेत्रात २०१५ पासून ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
मात्र, संपूर्ण राज्यभरात त्याचा विस्तार करण्याचे काम झालेले नाही. लवकरच ही व्यवस्था संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मालमत्तांशी संबंधित नोंदणीची कामे सुलभ आणि लवकर होण्यास मदत मिळणार आहे.
सध्या ७० टक्के नोंदणी बंगळूर येथे होते. तर उर्वरित ३० टक्के राज्यातील अन्य महसूल जिल्ह्यात करण्यात येत आहे. बंगळूर शहरात लागू करण्यात आलेली ही व्यवस्था राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.
पुढील काही दिवसात प्रायोगिकरित्या बेळगाव आणि तुमकुर या जिल्ह्यात ही व्यवस्था राबविण्यात येणार आहे. त्यानंतर येथील प्रतिसाद पाहून पुढील दोन ते तीन महिन्यात संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे.
सध्या बंगळूर येथे यशस्वीरित्या ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मालमत्तांशी संबंधित नोंदणी करण्यासाठी ताटकळत राहण्याची गरज भासणार नसल्याने हे कामकाज करण्यासाठी वेळ वाचणार आहे. आपल्याला अनुकूल ठरणाऱ्या उपनोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करून घेण्यासाठी सर्वसामान्यांना लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे.