बेळगाव लाईव्ह: किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे येत्या शुक्रवार दि. 16 ते रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भगवान रामकृष्ण परमहंस विश्वभावैक्य मंदिराचा वार्षिक उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जाणार असल्याची माहिती रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावचे सचिव स्वामी आत्मप्राणानंद यांनी दिली.
शहरांमध्ये आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. स्वामी आत्मप्राणानंद म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी संन्यास घेऊन देश पर्यटनाला सुरुवात केली त्यावेळी ऑक्टोबर 1892 मध्ये त्यांचे बेळगावमध्ये आगमन झाले होते. त्यावेळी प्रारंभीचे तीन दिवस ते बेळगावातील श्रीयुत सदाशिव भाटी नामक ख्यात वकिलांच्या घरी वास्तव्यास होते. त्यानंतरचे नऊ दिवस ते बेळगावच्या किल्ल्यातील अरण्य अधिकारी हरिपाद मित्र यांच्या बंगल्यात राहिले होते.
स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये रामकृष्ण मिशन आश्रमाची 2000 साला मध्ये स्थापना झाली. तसेच जानेवारी 2004 मध्ये भगवान रामकृष्ण परमहंस यांचे ‘विश्वभावैक्य’ मंदिर उभारून त्याचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराचा 20 वा वर्धापन दिन अर्थात वार्षिक उत्सव येत्या 16 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान साजरा केला जाणार आहे.
सदर उत्सवांतर्गत पहिल्या दिवशी शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘युवा संमेलन’ भरविले जाणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत शिक्षक आणि बीएड कॉलेज विद्यार्थ्यांचे ‘शिक्षक संमेलन’ आयोजित केले जाणार आहे. शेवटच्या दिवशी रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत आध्यात्मिक संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे.
आध्यात्मिक संमेलनानंतर सायंकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत श्री दत्ता चित्ताळे आणि सहकाऱ्यांचा ‘गीतरामायण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा बेळगावसह आसपासच्या ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी आत्मप्राणानंद यांनी केले.
त्याचप्रमाणे हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे श्रीरामकृष्ण, श्रीशारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांचे जीवन, त्यांचे संदेश आणि उदात्त वेदांताचा संदेश, भारताची श्रेष्ठ संस्कृती, परंपरा जनमानसाच्या मनात रुजवणे हा आहे. चांगले उन्नत विचारामुळे लोकांच्या जीवनात यश, सुख, शांती आणण्याद्वारे श्रेष्ठ समाज निर्माण करण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे, असेही स्वामीजींनी स्पष्ट केले.