Tuesday, June 25, 2024

/

एनएचएम एम्प्लॉ. युनियनतर्फे 15 पासून बेमुदत संपाची हाक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पगार वाढ, नोकरीत कायम करणे यासह आपल्या अन्य विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता व्हावी या मागणीसाठी अखिल कर्नाटक राज्य समुदाय आरोग्य एनएचएम कॉन्ट्रॅक्ट्चुअल एम्प्लॉईज युनियनतर्फे येत्या गुरुवार दि. 15 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती युनियनच्या बेळगाव जिल्हा सरचिटणीस लक्ष्मी कन्नूर यांनी दिली.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. सरचिटणीस लक्ष्मी कन्नूर म्हणाल्या की, आम्हाला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) म्हणून ओळखले जाते.

आमची नेमणूक ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर्सची जी कमतरता भरून काढण्यासाठी केली जाते. यासाठी आम्हाला 6 महिने एमडी झालेल्या तज्ञ डॉक्टरांकडून चांगले प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर सरकार दोन परीक्षा घेते. या परीक्षेमध्ये गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या पूर्णपणे सक्षम सीएचओंची रुग्णसेवेसाठी नियुक्त केले जाते.

 belgaum

गेल्या अनेक वर्षापासूनची आमची राज्य सरकार आणि आरोग्य खात्याकडे मागणी आहे की प्रत्यक्ष फिल्डवर 6 महिने काम केलेल्या सीएचओंना नोकरीत कायम केले जावे. तशी मार्गदर्शक सूची देखील आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी 5 टक्के पगार वाढ केली जावी. कारण दरवर्षी सर्व सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांची पगार वाढ होत असते, मात्र 5 टक्क्याने आमची पगार वाढ करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तेव्हा दरवर्षी 5 टक्के पगार वाढ मिळण्याबरोबरच दर तीन वर्षांनी 10 टक्के रॉयल्टी बोनस मिळाला पाहिजे.Nhm

सीएचओंची त्यांच्या गावात जिल्ह्यात नियुक्ती केल्यास ते 24 तास आपली सेवा देऊ शकतात हे लक्षात घेऊन वर्षातून एकदा तरी जिल्हावार बदल्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आमच्या कॅडरसाठी जॉब डिस्क्रिप्शन अद्याप जारी झालेले नाही ते जारी केले जावे. जेणेकरून आम्हाला व्यवस्थित लक्ष केंद्रित करून आपले कौशल्य आणि ज्ञान पणाला लावून काम करता येईल. आम्हाला जर बहुउद्देशीय कामगारांप्रमाणे वापरण्यात आले तर आम्हाला आमचे नेमून दिलेले काम पूर्ण क्षमतेने करता येणार नाही. हे सरकार व आरोग्य खात्याने लक्षात घ्यावे.

आमच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आम्ही वारंवार अर्ज विनंती करत आहोत आमचे काम हे अत्यावश्यक सेवेत मोडणारे असल्यामुळे वरचेवर आंदोलन करणे किंवा संपावर जाणे आम्हाला उचित वाटत नाही. यासाठी आतापर्यंत आम्ही शांततेने आमच्या मागण्या मांडत आलो आहोत. मात्र आमच्या कॅडरकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता आमची सहनशक्ती संपत आली आहे.

तेव्हा येत्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या मागण्यांचे ठराव देखील संमत केले जावेत. कारण आमची सेवा केंद्राशी संलग्न असल्यामुळे केंद्राकडून आमच्यासाठी पुरेसा निधी पाठवला जातो. तेंव्हा आमच्या मागण्या मान्य केल्यास राज्य सरकारवर आर्थिक बोजा पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आम्हाला जर चांगला पगार मिळाला तर आम्ही अधिक हुरूपाने काम करू शकू चांगले जीवन जगू शकू, असे सांगून आमच्या मागण्यांची सरकारने तात्काळ दखल घ्यावी यासाठी आम्ही येत्या 15 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे, असे लक्ष्मी कन्नूर यांनी शेवटी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस अखिल कर्नाटक राज्य समुदाय आरोग्य एनएचएम कॉन्ट्रॅक्ट्चुअल एम्प्लॉईज युनियनचे राज्य संयुक्त सचिव अमृत मज्जगी, राज्य सदस्य बसाप्पा इंगळगी, अध्यक्ष शरणबसप्पा कोळी, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन सक्री, यल्लाप्पा कतराळ, खजिनदार संगमेश बंद्रोळी, संयुक्त सचिव उमेश निजगुनी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.