Tuesday, January 14, 2025

/

अस्तित्वाच्या लढाईसाठी लोकसभा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : सीमाभागात सध्या मराठी माणसाचे अस्तित्व संपविण्याचा घाट सुरु आहे. जमिनी संपादित करणे, मतदार संघाचे विभाजन करणे, ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आपले पाय घट्ट रोवून उभा आहे त्या ठिकाणी आमिषबाजी करून मराठी माणसाचा एकसंघपणा तोडणे, प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक मराठी माणसाला लक्ष्य करून अडचणीत अडकवणे यासह अनेक गोष्टींमध्ये मराठी माणूस भरडला जात आहे. मात्र आता लवकरच लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून या पार्श्वभूमीवर मराठी माणसाच्या सभोवती पिंगा घालण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून करण्यात येत आहे.

सीमावर्ती भागात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाला मतदान करून समितीला मतदान करणे हि बाब १०० टक्के चुकीची आहे. सीमाभागातील मराठी माणसाचा टक्का जर अबाधित ठेवायचा असेल तर आपला हक्क नोंदविण्यासाठी मतपेटीचाच आधार घ्यावा लागतो, हि बाब अनेकवेळा अधोरेखित झाली आहे.

सीमावर्ती भागात मराठी माणसाची टक्केरवारी किती प्रमाणात आहे हे मराठी माणसाने केलेल्या मतदानावरून स्पष्ट होते. मराठी माणसाच्या मतांची टक्केवारी केंद्रापर्यंत पोहोचते. यामुळे सीमाभागातील मराठी माणसाचे अस्तित्व काय आहे, मराठी माणसाच्या मागण्या कोणत्या आहेत या गोष्टीची नोंद आपल्याला करायची असेल तर बहुसंख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करणे गरजेचे आहे. यानुसार मतांची नोंदणी होऊन ज्यावेळी निकाल येईल, त्यावेळी राष्ट्रीय पक्षांना याची नोंद घेऊन दिल्लीपर्यंत याचा प्रभाव तयार होण्यास मदत होईल.

प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचे पथक प्रत्येक ठिकाणी निरीक्षक नेमते. या निरीक्षकांच्या पथकाकडून प्रभागवार घडणाऱ्या घटनांचा आढावा पक्षश्रेष्ठींकडे नोंदविला जातो. यानुसार सीमाभागात ज्या ज्या गोष्टी घडतात, त्या गोष्टी थेट दिल्लीपर्यंत पोहोचतात. आपण आपलं एक मत समितीसाठी दिल तर मतदानाच्या माध्यमातून मराठी माणसाची इच्छाशक्ती नोंदविली जाती. मतदानाची दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे मतदान मराठीसाठी आहे हे स्पष्ट होते. ज्यावेळी आपण निवडणुकीला सामोरे जातो, त्यावेळी एक महत्वपूर्ण बाब मराठी माणसाने लक्षात ठेवली पाहिजे. सीमाभागात मराठी माणसाचे मतदान टिकून राहिले पाहिजे. मराठी माणसाचे मत समितीला दिल्यामुळे ते न कुजता समितीच्या खात्यात जमा होते आणि यामुळे समितीचा दरारा वाढतो.या पद्धतीची विचारसरणी ठेवून येत्या लोकसभेला मराठी माणसाने आपले कर्तव्य लक्षात ठेवून समितीच्या उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्ष मराठा समाजाची व्होटबँक कशापद्धतीने तोडण्याचा प्रयत्न करत आहे, यावर समितीने कसा ताबा मिळविला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षांचा नेहमीच होरा असतो कि, लोकसभेसाठी समितीने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू नये, याचा समितीला काहीच फायदा होणार नाही. परंतु या गवगव्यात कोणतेच तथ्य नसते. कारण नोंदविल्या गेलेल्या प्रत्येक मताची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते.Loksabha

आपण मराठी आहोत आणि आपण मराठीचाच मतदान करतो याचा अर्थ आपण आपलं मत समितीच्या कार्यपद्धतीला देत आहोत. मराठी माणूस आपल्या न्याय्य हक्कासाठी, न्याय्य मागण्यांसाठी मराठी माणसाला मतदान करत आहे. घटनेने दिलेल्या वैयक्तिक अधिकारांच्या अंतर्गत मतदान करत आहे. समितीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याची परंपरा सुरु केली याचे स्वागतच झाले आहे.

आजवर समितीने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी सीमाभागातील मराठी जनता खंबीरपणे उभी राहिली आहे. रस्त्यावर उतरून प्रचार करणे, पदयात्रा काढणे, वेळप्रसंगी उमेदवारासाठी पदरमोड करून आर्थिक नियोजन करणे यावरून राष्ट्रीय पक्षांच्या कार्यप्रणालीला छेद मिळतो, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतदेखील आपला मराठी बाणा आणि आपले मराठीपण सिद्ध करण्यासाठी, आपले अस्तित्व आणि वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने समितीच्या उमेदवारालाच मतदान करणे हि खरी गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.