बेळगाव लाईव्ह :सीमाभागातील मराठी जनतेच्या समस्या तात्काळ महाराष्ट्र शासन दरबारी पोचवण्यासाठी महाराष्ट्राने सीमेवर विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी बैठक करून सीमाभागात अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती त्यानुसार महसूल आणि वन विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर प्रांत अधिकाऱ्यांना समन्वयक विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश बजावला आहे.महसूल आणि वन खात्याचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी दोन्ही सीमेवरील अधिकाऱ्यांची समन्वयक अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. सदर अधिकारी सीमाभागातील निवेदने सूचना आणि तक्रारी स्वीकारणार आहेत.
बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेसाठी काम करणारा आणि त्यांच्या सर्व समस्या महाराष्ट्रात पोचवणारा नायब तहसीलदार दर्जाचा नोडल अधिकारी शिनोळी ग्राम पंचायतीत नियुक्त केला जाणार आहे. गडहिंग्लज प्रांत अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या एक नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
शिनोळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) ग्राम पंचायतीमध्ये सीमाभाग मुख्य समन्वयक अधिकारी व गडहिंग्लज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीस चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, रणजित चव्हाण -पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.
शिनोळी ग्रामपंचायती मधील नोडल अधिकारी आरोग्य, शिक्षण आदी सोयी -सुविधा बेळगावातील मराठी लोकांसाठी उपलब्ध करून देण्याकरिता समन्वयक म्हणून काम करेल अशी माहिती गडहिंग्लज प्रांत अधिकाऱ्यांनी बैठकीवेळी दिली. पुढील 24 फेब्रुवारी दरम्यान नोडल अधिकारी कार्यरत असेल असेही यावेळी सांगण्यात आले आहे.