बेळगाव लाईव्ह : बेळगाव हा बहुल मराठी भाग आहे. याठिकाणी तब्बल ४ लाख मराठी भाषिक राहतात. परंतु तरीही आपला समाज मागासलेला आहे. राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला प्रगत करण्यासाठी समाजातील तळागाळातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरवून सर्व मराठा समाजाने आपली ताकद दाखवावी, असे आवाहन बेंगळुरू गोसावी मठाचे मंजुनाथ भारती स्वामी यांनी केले.
आज मराठा समाजाचे श्री जत्तीमठ देवस्थान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. बेळगावमधील मराठा समाज राजकीय दृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तब्बल ४ लाख मराठी लोक असूनही बेळगावमध्ये मराठी माणसाची ताकद कमी पडत आहे.
आपली ताकद दाखविण्यासाठी मराठी भाषिकांनी लोकसभा निवडणूक लढवणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील तळागाळातील, गल्लीबोळातील सर्व मराठी भाषिकांनी एकसंघ होऊन एकत्रित येऊन एकाच झेंड्याखाली निवडणूक लढविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मंजुनाथ स्वामी पुढे म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता एकत्र येऊन, संघटित होऊन लढणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी जरी डावललं तरी अपक्ष म्हणून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभं करून, त्या उमेदवाराला निवडून आणायची जिद्द ठेवावी.
जिल्ह्यात ४ लाख मराठी लोक असूनही जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर ठेवले जात आहे. हा दोष कोणत्या पक्षाचा नसून समाजाचा आहे. यासाठी व्यक्तिगत रोष आणि दोष दूर करून समाजाच्या भल्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. विस्कळलेल्या समाजाला एकत्र येऊन, एकाच झेंड्याखाली येऊन समाजासंदर्भात अभिमान आणि स्वाभिमानाची भावना रुजवली पाहिजे, असे मत स्वामीजींनी व्यक्त केले.
शालेय शिक्षणासह संस्कृती रुजविण्यासाठी…
श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना होणार : मंजुनाथ भारती स्वामी
बेळगाव लाईव्ह : हल्लीची पिढी हि व्यसनाच्या आहारी जात आहे. देशातील प्रत्येक तरुणाला साधू-संत,वारकऱ्यांचे, संस्कृतीचे शिक्षण मिळावे यासाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातील हल्याळ येथे श्रीहरी गोसावी मठाच्यावतीने श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना करण्यात येत आहे. या गुरुकुलाचे भूमिपूजन ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आले असून या सोहळ्याला समाजातील नेत्यांनी आणि जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन बेंगळुरू येथील गोसावी मठाचे मंजुनाथ स्वामी यांनी केले.
सदर भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आज ते बेळगावमध्ये आले होते. यावेळी मराठा समाजाचे जत्तीमठ देवस्थान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंजुनाथ भारती स्वामी यांनी गुरुकुलासंदर्भात माहिती दिली.
हल्याळ येथे ३ एकर जागेत हे गुरुकुल उभारण्यात येत असून हजारो मुलांना शालेय शिक्षणासह संस्कृत, संस्कृती,संगीत, वेद, उपनिषद, भगवदगीता, ज्ञानेश्वरी, वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यात येणार आहे. भावी पिढी हि व्यसनाधीन होत आहे. चुकीच्या मार्गावर जात आहे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी समाज संघटन करून समाजाच्या माध्यमातून गुरुकुल उभारून भावी पिढी घडविण्याच्या उदात्त हेतूने गुरुकुलाची स्थापना करण्यात येत आहे. मुलांना गुरुकुलाची माध्यमातून चांगली दिशा मिळावी यासाठी श्रीहरी श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या गुरुकुलाची भूमिपूजनाचा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यासाठी अयोध्या, काशी, महाराष्ट्र, गोवा यासह कर्नाटकातील विविध स्वामी, गोव्याचे मुख्यमंत्री, समाजप्रमुख, नेते आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास समाजातील जनतेनेही उपस्थित राहावे, असे आवाहन मंजुनाथ भारती स्वामींनी केले. यावेळी रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, किरण पाटील, सतीश पाटील, दत्ता जाधव , शिवराज पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.